तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

विभागीय आयुक्त पियुष सिंग यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी
:- केळवद व भादोला येथील शेतकऱ्यांशी साधला संवाद

बुलडाणा, दि. 7 -  जिल्ह्यात अवकाळी पावसाने सर्वदूर थैमान घातले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी आज विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी केली. भादोला व केळवद येथील शेतात बांधावर जावून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी विभागीय आयुक्त यांनी संवाद साधला.
    भादोला येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी  पुजा शिवाजी निकम, शंकरअप्पा दगडअप्पा चित्ते आणि केळवद येथील ज्वारी उत्पादक शेतकरी निशाबाई दिलीप पाटील यांच्या शेतात पाहणी केली. तसेच नुकसानीचा आढावा घेत पंचनामे पूर्ण करून मदत दिल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 - - - - - - ----------  
                                             
शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
:- विभागीय आयुक्त      
:- यंत्रणांची आढावा बैठक
बुलडाणा, दि. 7 -  जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करण्यात यावा. शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिल्या.
  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात पिक नुकसानीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. लहाने आदी उपस्थित होते.
   सर्व नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशीत करीत विभागीय आयुक्त म्हणाले, विमा कंपनीने नुकसानीपोटी विमा काढलेल्या पिकांकरीता तात्काळ विमा अदायगी करावी. तसेच गंभीरतेने शेतकऱ्यांच्या समस्या समजून त्यांचे निरसन करावे. अति पावसामुळे चारा पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात चारा टंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे. यासाठी पशुसंवर्धन व कृषि विभागाने समन्वयातून नियोजन करावे. यावर्षी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यानुसार रब्बीसाठी बियाण्यांचे नियोजन करून ठेवावे. महाबीजकडे अतिरिक्त बियाण्यांसाठी मागणी नोंदवून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे.
  ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात रब्बी क्षेत्र वाढणार असल्यामुळे रोहीत्रांवर दाब येवून नादुरूस्त होण्याचे प्रमाणही वाढेल. यासाठी महावितरणने नियोजन करून कुठल्याही परिस्थितीत रोहीत्र नादुरूस्त झाल्यास तात्काळ नवीन रोहीत्र उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना चारा पिक घेण्यासाठी प्रोत्साहित करून चारा पिकांचे बियाणे द्यावे. जेणेकरून चारा टंचाई आल्यास यामधून ती भरून निघेल. तसेच जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे घर, गोठे यांची पडझड झालेली आहे. त्यांचे सर्वे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी. यावेळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment