तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 November 2019

भारत बांग्लादेश टि-२० मालिकेच्या निमित्ताने           बांग्लादेशचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात ते टि २० व कसोटी मालिका खेळणार आहे. बांग्लादेशचा संघ भारताविरूद्ध भारतात प्रथमच पूर्ण टि २० मालिका खेळणार असून रविवारी ३ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडीयम मध्ये दूषित वातावरणात हा सामना खेळला जाणार असून बहुतेक दोन्ही संघाचे खेळाडू मास्क लावून खेळताना आपल्याला दिसू शकतात. तर प्रेक्षकही स्वतःच्या जिवीताची काळजी घेत मास्क लावूनच सामन्याचा आस्वाद घेण्याची शक्यता आहे. दुसरा सामना ७ नोव्हेंबर रोजी राजकोट तर तिसरा सामना १० तारखेला नागपूरला होणार आहे. हे दोन्ही देश आपसात जास्त सामने खेळले नसले तरी जे काही सामने झाले त्यात सर्वाधिक वेळा भारताचीच सरशी झाली असून या मालिकेचा निकालही काही वेगळा लागण्याची शक्यता नाही.

                     भारत व बांग्लादेश या दोन संघात आतापर्यंत आठ सामने खेळले गेले असून त्या सर्व सामन्यात भारत अपराजित आहे. सन २०१६ च्या टि-२० विश्वचषक स्पर्धेत या दोन संघात साखळीचा एक सामना खेळला गेला असून तो भारताने एका धावेने जिंकला आहे. या दोन देशांदरम्यान भारतभूमीवर खेळला गेलेला हा एकमेव सामना असून १८ मार्च २०१८ रोजी कोलंबो येथे निधास चषकाच्या अंतिम फेरीत बांग्लादेशला हरवून भारताने विजेतेपद मिळविले तो या दोन देशांदरम्यान खेळलेला शेवटचा टि- २० सामना होय.

                   दोन्ही संघांकडून सर्वाधीक धावा करणाऱ्या खेळाडूंवर नजर टाकली तर या आघाडीवर आहे या मालिकेचा भारतीय कर्णधार रोहीत शर्मा. रोहीत या दोन संघात झालेल्या सर्व टि २० सामन्यात खेळला असून त्यामध्ये ४४.५० च्या सरासरीने ३५० धावा काढल्यातून रोहीतचाच सलामीचा साथीदार शिखर धवन सात सामन्यात २६.५७ च्या सरासरीने १८६ धावा काढून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

                 बांग्लादेशकडून शब्बीर रहेमान भारताविरूध्द सर्वाधिक धावा करणाऱ्यात पुढे असून तो या मालिकेसाठी बांग्लादेशी संघात निवडला नसून सध्याच्या संघातील यष्टीरक्षकफलंदाज मुशिफिकूर रहीम ८ सामन्यात ३३च्या सरासरीने १६५ धावा काढून दुसऱ्या स्थानावर आहे. तोच सध्या त्यांचा प्रमुख आधारस्तंभ असून भारतासाठी तो अनेकदा डोकेदुखी ठरलेला असल्याने भारतीय संघ प्रबंध त्यावर नक्कीच तोडगा काढेल ही अपेक्षा.

                   एक दिवशीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर सतत क्रिकेट खेळणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात आराम देऊन कर्णधारपदाची जबाबदारी रोहीत शर्माच्या मजबूत खांदयावर ठेवण्यात आली आहे. भारताचा सर्वो वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे संघाबाहेर आहे, तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या शस्त्रक्रिये नंतर अद्याप ठिक झाला नाही. या पार्श्वभूमिवर त्यांच्या जागेवर निवडलेल्या खेळाडूंना आपला जलवा दाखविण्याची सुवर्णसंधी आहे. अष्टपैलू शिवम दुबे व संजू सॅमसन याचा कितपत लाभ उठवितात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

                शिवम दुबे प्रथमच भारतीय संघात निवडला असल्याने त्याच्याकडे अनुभवाचा अभाव असणार हे नक्की. तर संजू सॅमसन यंदा देशांतर्गत स्पर्धेत स्टंपच्या मागे व पुढे दोन्हीकडेही चमकला असल्याने चार वर्षानंतर संघात परतला आहे. यापूर्वी १९ जुलै २०१५ रोजी झिंबाब्वेविरूध्द एकमेव टि-२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याला सतत डावलले गेले होते. आता मात्र तो परिपक्व होऊन संघात परतल्याने त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जर संजू सॅमसन यशस्वी ठरला तर रिषभ पंतचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते.

                 बांग्लादेशच्या संघावर एक नजर टाकली तर तो यंदा तरी भारताला शह देण्याची शक्यता कमीच वाटते. त्यातच त्यांचा कर्णधार व अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन सामना निश्चिती प्रकरणी दोन वर्षांच्या बंदीवासात गेल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढच होण्याची शक्यता आहे. शिवाय भारतात भारताला हरविणे सोपे नसल्याने बांग्लादेशापुढे स्वतःची इज्जत सांभाळणेच जिकरीचे ठरणार आहे. 


लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment