तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 November 2019

अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी कृषी कार्यालया समोर गर्दी ; शासनाकडे सर्व माहिती असताना ही नसती उठाठेव कशासाठी ? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल


केज (प्रतिनिधी) :- जगाचा पोशिंदा म्हणून नुसते रिकामे मोठेपण दिलेला शेतकरी आपली शेती हट्टी व बेभरवशाच्या लहरी पाऊस आणि निसर्गावर लावलेला जुगार आहे. हे माहीत असूनही जेव्हा शेतकऱ्यांना निसर्ग आणि सरकारी नियमाने सरकार दोन्ही सारखेच त्रासदायक ठरतात. या वर्षी पेरणी पासून ते पीक काढणीला येईपर्यंत अत्यंत कमी म्हणजे सरासरीच्या अवघा एक तृतीयांश पाऊस झाला. त्या अल्प पावसावर कापूस, बाजरी, तूर, मका, पिवळी ज्वारी अशी पिके कशीबशी आली. परंतु ऐन काढणीला आलेले सोयाबीन व बाजरीचे पीक काहींनी शेतात कापणी करून टाकले तर काहींचे उभे असलेले पीक कापणीच्या वेळीच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्या पासून ते नोव्हेंबर पर्यंत दररोज पडणाऱ्या जोरदार पावसाने पूर्णतः हातची गेले आहेत. कापणी करून शेतात टाकलेल्या आणि उभ्या  असलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत; तर वेचणीला आलेल्या कापूस भिजून तयार अळ्या होऊन सरकीला कोंब फुटले आहेत. तसेच उभी पिवळी ज्वारी आणि काढून टाकलेली बाजरी यांनाही कोंब उगवले आहेत. त्यामुळे पिके वाया गेली आहेत.*


अनेक शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे पंतप्रधान पीक विमा भरलेला आहे मात्र आता अतिवृष्टीमुळे कापणी केलेली आणि उभी पिके यांच्या नुकसानीच्या भरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर एक फतवा निघाला असून शेतकऱ्यांनी बाहत्तर तासात विहित नमुन्यात अर्जासोबत ७/१२ चा उतारा, ८-अ आणि विमा हप्ता भरल्याच्या पावतीसह अर्ज करण्याचा अटीमुळे पुन्हा शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवून प्रसंगी चिरीमिरी देऊन हे सर्व कागदपत्रे घेऊन कृषी कार्यालयाच्या दारात थांबण्याची वेळ आली आहे.


हे अर्ज भरण्यासाठी अल्प कालमर्यादा असल्याने केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रचंड रांगा तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर लागल्या असून प्रचंड गर्दी झाली आहे. केज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव आणि कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना तासंनतास उभे रहावे लागत आहे. तर अनेक वृद्ध आणि महिलांनाही या प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणून अगोदरच पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना पुन्हा अतिवृष्टी झाल्याने जे आलं ते ही गेलं आणि शेवटी सरकारी फतव्याने मेटाकुटीला आणले आहे.

No comments:

Post a comment