तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 November 2019

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले नेते परतीच्या मार्गावर परंतु त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद : प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील


बाळू राऊत प्रतिनिधी 
विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बहुतांश आमदार भाजपा-शिवसेनेत गेले. त्यातील 80 टक्के आमदार पराभूत झाले. त्यामुळे ते परतीच्या मार्गावर आहेत. शिवाय भाजपामधून निवडून आलेल्या आमदारांची भाजपलाच शाश्‍वती राहिलेली नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुंबईत सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
स्नोपिंग प्रकरणी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद बोलविली होती.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, भाजपाला 145 आमदारांची मॅजिक फिगर गाठता आली नाही. त्यामुळे ते विश्‍वासदर्शक ठरावापर्यंत जाण्याची शक्यता फारच धूसर आहे. विधानसभा 2014 च्या निवडणूकीत भाजपा-शिवसेनेने जनतेला जे वचन दिले, ती गेल्या पाच वर्षात त्यांनी सत्तेवर आल्यावर किती पूर्ण केली. या पाच वर्षाच्या काळात दोन पक्षातील मतभेद जनतेला दिसून आले. 2019 च्या निवडणूकीत भाजपाला 105 जागा तर शिवसेनेला 56 अशा दोघांच्या मिळून 161 जागा युती म्हणून निवडून आल्या. सत्तेसाठी 145 आकडे दोघांकडे पुरेसा असतानाही ते अपक्षांच्या मागे लागले आहेत. यावरुन त्यांच्यात काय चालले हे दिसून येते. या दोन्ही पक्षांनी आमदारांची बेरीज करण्यापेक्षा तत्व पाळावी, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी सोडून अनेक नेते भाजपा-सेनेत गेले. त्यातील बहूतांश पराभूत झाले. त्यातील काही परतीच्या मार्गावर आहेत. आमचे असे मत आहे की, सोडून गेलेल्यांनी त्यांच्या (भाजपातील) घरातच रहावे असे सांगून त्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद असल्याचे जयंत पाटील यांनी सूचित केले. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षांमध्ये बसण्यासाठी कौल दिला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीवरुन आम्ही सध्या तटस्थेची भूमिका स्वीकारलेली आहे. परंतु राज्यात आणीबाणीची वेळ आम्ही येऊन देणार नाही हे सत्य आहे.
जनतेची फसवणूक करण्यात राज्यसरकार माहिर : जयंत पाटील
कोल्हापूर, सांगली महापूर काळातील मदत अद्यापपर्यंत पुरग्रस्तांना मिळालेली नाही तर सध्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे फार नुकसान झालेले आहे. राज्यसरकारने दहा हजार कोटींची मदत जाहीर केली. पण ; तेवढी मदत पोहोचलेली नाही. राज्यसरकार जनतेची फसवणूक करीत आहे. ही मदत मिळावी यासाठी पुढील दोन दिवसांत राज्यपाल यांना भेटणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a comment