तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 December 2019

काळभैरव यात्रेस उपस्थित राहावे- मंगेश फड


आंध्राच्या भाविकांचे आराध्य दैवत काळभैरव ; यात्रेची जय्यत तयारी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी तालुक्यातील मांडवा येथे मार्गशीर्ष पौर्णिमेला बोरणा नदीच्या काठावर वटवृक्षाच्या छायेत वसलेल्या ग्रामदैवत श्री.काळभैरवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला दरवर्षी महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक,तेलंगणा आदी परराज्यातून शेकडो भाविक भक्त आवर्जून हजेरी लावतात. आंध्र प्रदेशातील मथुरा व लभान समाज काळभैरवास आपले कुलदैवत मानत असल्याने या समाजातील भाविक यात्रेत मोठ्या हर्ष, उत्साहाने संपूर्ण कुटुंबासह सहभागी होतात. दूर-दुरून आलेल्या पाहुणे भक्तांची ग्रामस्थही अगदी घरच्यासारखी सोयरीक करतात. काळभैरवाची तीर्थक्षेत्रे अल्प असल्याने भाविकांच्या दर्शनाचा दुर्मिळ योग विविध तिर्थक्षेत्रांनी परिपूर्ण परळी शहरापासून नजीकच असलेल्या मांडवा येथे जुळून येतो. अनादी काळापासून बोरणा नदीच्या काठावर वसलेलं काळभैरव तीर्थक्षेत्र मथुरा व लभान समाजाचे श्रद्धास्थान असून मराठवाड्यातील एकमेव काळभैरवाचे देवस्थान आहे. येथे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजक कार्यक्रमांनी परिपूर्ण अशा भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या मंदियाळीमुळे हा परिसर यात्रेच्या काळात भक्तीमय लहरीमध्ये न्हाऊन निघतो. यात्रेस येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मांडवा ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतात.
            यावर्षी हा यात्रोत्सव दि.११ व १२ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. दरम्यान ११ डिसेंबर रोजी टाळ मृदंगच्या गजरात व काळभैरवाच्या नामघोषात भव्य पालखी मिरवणूक, महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रम तर दि.१२ डिसेंबर रोजी ग्रामस्थांच्यावतीने महाराष्ट्रातील कुस्तीगीरांसाठी भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्तीदंगलीसाठी परिसरातली सर्व कुस्तीगीरांनी उपस्थित राहावे व परिसरातील भाविकांनी यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी यात्रेत सहभागी होऊन काळभैरवाचे कृपाशीर्वाद घ्यावेत असे आवाहन सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे मंगेश फड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment