तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 December 2019

'सीईओं' कडून ग्रामसेवक, विस्तार अधिकारी धारेवर५८ गावांत शौचालयाचे बांधकामच नाही

सेलू ( जि.परभणी ) / प्रतिनिधी  : जिल्हा हागणदारीमुक्त झाला असतांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सेलू तालुक्यातील ५८ गावात अजूनही शौचालय बांधकामांचे दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण का गेले नाही, यावरून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी बुधवारी ( ४ डिसेंबर ) ग्रामसेवकांसह पाचही नोडल अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.
तातडीने बोलविलेली ही तालुकास्तरीय समन्वय समितीची  बैठक सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत चालली. बैठकीत पृथ्वीराज यांनी पंचायत समितीच्या विविध विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विकास योजनांचा आढावा घेतला.  यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेलकर, श्रीमती कापसे, यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पृथ्वीराज यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरोघरी शौचालय बांधकामासाठी आवश्यक तो निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला, तरीही तालुक्यातील ९२ पैकी ५८ ग्रामपंचायतींनी अद्यापही शौचालय बांधकाम केले नाही. यावरून विस्तार अधिकाऱ्यांनाही चांगलीच तंबी दिली, तर ग्रामसेवक व पाचही नोडल अधिकाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत ९ हजार ८८ शौचालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा; नसता कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम दिल्याचे समजते. दरम्यान, बहुचर्चित तालुका स्तरीय शिक्षण परिषद २० डिसेंबर पर्यंत आयोजित केली जावी, अशा सूचना शिक्षण विभागाला केल्याचे कळते. बैठकीला पंचायत समितीच्या आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणी पुरवठा, बांधकाम, शिक्षण,पशुसंवर्धन, स्वच्छ भारत मिशन आदी विभागातील कार्यालयीन प्रमुख, पंचायत समितीचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक गटविकास अधिकारी विष्णू मोरे यांनी केले, तर धायडे  आभार मानले.

दरम्यान, कार्यालयीन आढावा बैठक असल्याने सभापतीसह अन्य पदाधिकाऱ्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते तसेच बैठकीत लोकहितार्थ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली हेही कुणी सांगण्याचे धारिष्ट्य दाखवत नव्हते. परंतु प्रामुख्याने स्वच्छ भारत मिशनच्या आढाव्यासाठीच तातडीने बैठक बोलाविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a Comment