तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 January 2020

परळीत राखेची वाहतूक बंद करण्यासाठी नागरिक उतरले रस्त्यावर ; हनुमान नगर भागात 2 तास रोखले टिप्पर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- औष्णिक विद्युत केंद्रामुळे परळी राज्यभरात प्रसिद्ध आहे.मात्र या वीजनिर्मिती केंद्रात वापरल्या जाणाऱ्या कोळशापासून तयार होणाऱ्या राखेमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन राखेच्या वाहतुकीवर कुठलीच कारवाई करत नसल्याने शनिवारी रात्री शहरातील नागरिकांनी थेठ रस्त्यावर उतरून राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा, टिप्पर अडवत आपला प्रशासनाविरुद्धचा रोष व्यक्त केला.तब्बल 2 तास ही वाहतूक रोखली गेली होती.

परळी तालुक्यासह शहरातल्या अंतर्गत मार्गावरून वीट भट्ट्यासाठी राखेची वाहतूक केली जाते.ही राखेची वाहतूक त्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने केली जाते परिणामी यामुळे ती राख वाहतुक होणाऱ्या मार्गावर मोठया प्रमाणात सांडली जाते.यामुळे या मार्गावरील नागरिकांना याचा विनाकारण त्रास सहन करावा लागतो.या सर्व बाबींकडे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.यामुळे शनिवारी रात्री वैद्यनाथ मंदिर ते घाटनांदूर रस्त्यावर असणाऱ्या हनुमान नगर भागातील नागरिकांनी राखेची वाहतूक करणाऱ्या 20 हायवा-टिप्पर अडवल्या होत्या.यामुळे या भागात काही काळ तणावही निर्माण झाला होता.

शनिवारी रात्री 10 पासून 12 वाजेपर्यंत या राखेच्या गाड्या हनुमान नगर भागातील रहिवाशांनी अडवून धरली होती.मात्र काही वेळाने पोलिसांच्या मध्यस्थीने ही वाहतूक करणाऱ्या वाहनांनावर कडक कारवाईच्या आश्वासनानंतर रहिवाशांनी वाहने सोडल्याचे समजते.दरम्यान राखेच्या वाहतुकीकडे वेळीच प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.शहरातून होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते मात्र ही वाहतूक परळीकरांसाठी मोठी समस्या झाली आहे.याकडे गंभीर बाब म्हणून लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments:

Post a comment