तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

हसतमुख चेहऱ्याचा सदाबहार खेळाडू -लक्ष्मीपती बालाजी


भारतीय क्रिकेटमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच खेळाडू होऊन गेलेत की जे फक्त प्रेक्षकांच्या भावानांचा विचार करून केवळ प्रेक्षकांसाठीच खेळायचे. प्रेक्षकांच्या समाधानातच आनंद मानायचे. प्रेक्षकांचा पैसा वसूल कसा करून दिला जाईल यातच धन्यता मानायचे. अशाच काही मोजक्या खेळाडूंमध्ये समावेश असलेला लढवय्या खेळाडू म्हणजे भारताचा माजी जलदगती गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी होय !
                २७ सप्टेंबर १९८१ रोजी तामिळनाडूतील चेन्नई येथे बालाजीचा जन्म झाला. एक जलदगती गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला लक्ष्मीपती बालाजी भारताकडून ८ कसोटी, ३० एकदिवशीय व ५  टि - २o सामने खेळला. यामध्ये ७१ फलंदाजांना तंबूत धाडण्यात तो यशस्वी ठरला. बालाजीची कारकिर्द अल्प जरी असली तरी रोमहर्षक होती. त्याच्या कारकिर्दीत घडलेल्या बऱ्याच घटना त्याला लोकप्रियच नव्हे तर अजरामर करून गेल्या.बालाजी त्याच्या कारकिर्दीत पुनरागमनचा बादशहा म्हणून ओळखला जायचा.
               सन २००१-०२ मध्ये त्याने रणजी पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सत्रात ३७ फलंदाजांना आपल्या पोत्यात भरण्यात तो सफल झाला. याचा लाभ त्याला लगेच मिळाला. सन २००२ मध्ये विंडीजविरुध्द वनडेत संधी मिळाली. पंरतु पहिलाच सामना त्याच्यासाठी वाईट ठरला फक्त ४ षटकात ४४ धावा त्याला मोजाव्या लागल्या व बळींची पाटीही कोरीच राहीली.
               सन २००४ मध्ये भारताने पाकिस्तानचा दौरा केला. त्यामध्ये क्रिकेटच्या सर्वच क्षेत्रात तो कमालीचा यशस्वी ठरला. त्याचा लाभ भारताला पाकिस्तानमध्ये प्रथमच मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम करण्यात झाला. शेवटच्या दोन वनडेत त्याला ५ बळी मिळाले. या मालिकेतील गंमतीशीर प्रसंग म्हणजे तो जिथे जाईल तिथे पाकिस्तानी मुली त्याला लग्नाची मागणी घालणारे फलक झळकवायच्या, याच मालिकेत एक जबरदस्त घटना घडली. बालाजीने पाकचा सुपरफास्ट गोलंदाज शोएब अख्तरला सणसणीत षटकार ठोकला. याने सर्वच जण अवाक् झाले होते. परंतु पुढच्याच चेंडूवर शोएबने एक वेगवान यॉर्कर टाकून बालाजीची बॅटच तोडली.
              सन २००५ मध्ये बालाजीच्या कमरेत जसप्रित बुमराहला झाली तशी ( स्ट्रेस फ्रॅक्चर ) जखम झाली. या दुखापतीने त्याचे तीन उमेदीचे वर्ष वाया गेले. नंतर त्याला अॅक्शन बदलून गोलंदाजी करावी लागली.आयपीएलमध्ये पुनरागमनने करताना जोरदार प्रदर्शन केले. चेन्नई साठी खेळताना पंजाब विरूध्द २४ धावात ५ बळी चटकावले. त्यात त्याने हॅट्रीक घेतली होती.आयपीएलमध्ये हॅट्रीक घेणारा बालाजी पहिला गोलंदाज ठरला.
                   आयपीएलमधील चांगल्या कामगिरीची पावती ही त्याला लगेच मिळाली. सन २०१२ ला श्रीलंकेत झालेल्या टि-२० विश्वचषक स्पर्धेत त्याची भारतीय संघात निवड झाली. तेथेही चमकदार मारा करताना भारताकडून सर्वाधीक ९ बळी घेऊन यशस्वी गोलंदाज ठरला.
                     बालाजीची गोलंदाजी जितकी धारदार होती अगदी तसेच त्याचे हास्य हृदयस्पर्शी होते. सतत हसतमुख दिसणाऱ्या बालाजीच्या हसऱ्या चेहऱ्याचे खरे रहस्य होते, लहानपणी त्याच्या चेहऱ्याचे झालेले ऑपरेशन ! यामुळेच तो सतत हसतमुख दिसायचा.
                     बालाजीच्या हास्याने केवळ भारतातीलच नव्हे तर कट्टर दुश्मन पाकिस्तानमधील क्रिकेटरसीकही दिवाने झाले होते. यातील सगळ्यात मोठा फॅन होता, पाकिस्तानचा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ ! सन २००२ मध्ये जरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला असला तरी त्याला खरी जागतिक ओळख मिळाली सन २००४ मध्ये. फार मोठया कालावधीनंतर भारताने तो पाक दौरा केला. त्यापूर्वी भारतीय संघाने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींसोबत एक तास घालविला. त्यावेळी वाजपेयींनी खेळाडूंना एक संदेश दिला, ' खेल ही नही दिल भी जितीए ' कदाचित अटलजींच्या या संदेशाचे बालाजीने तंतोतंत पालन केले असावे.
                बालाजीची गोलंदाजीची अॅक्शन दिसायला एकदम सोपी पण क्वीक आर्म होती. त्यामुळे पहाणारेही मंत्रमुग्ध व्हायचे. बालाजीने गोलंदाजीला रन अप घेताच अखंड स्टेडीयममध्ये 'बालाजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी, यहां बिजली खड़ी' असा सूर उमटायचा त्या वेळी प्रेक्षकांसोबत खेळाडूंनाही हसू आवरत नसायचे .
                 मैदानावर हसतमुख असणारा लक्ष्मीपती बालाजी खऱ्या खुऱ्या लक्ष्मीचाही धनी आहे. पहाता पहाता वयाची ३८ वर्ष लोटली. निवृत्त होऊनही बरेच दिवस झाले पण बालाजीला क्रिकेट रसिक आजही विसरले नाहीत. 

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
 प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२८२.

No comments:

Post a comment