तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

विक्रमही भारतीय संघाच्या प्रेमात पडले.


              एखादी गोष्ट चांगली व्हायला लागली की सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या व्हायला लागतात. अगदी तसाच प्रकार सध्या भारतीय क्रिकेट संघाबाबत घडत आहे. त्याचच बघा ना,  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या मालिकेअंतर्गत भारत व बांगलादेश यांच्यात पहीला कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळविण्यात आहे. पाच दिवसांचा हा सामना अवघ्या तीन दिवसात संपवून भारताने गुणतालिकेत त्रिशतकी मजल मारली. भारताने हा सामना एक डाव व १३० धावांनी खिशात टाकून पाहुण्यांच्या तोंडचे पाणीच पळविले. या सामन्यात तसे बघाल तर सांघिक खेळामुळेच भारत सहज जिंकला असला तरी अनेक जण या विजयाचे शिल्पकार गोलंदाजांना ठरवत आहेत. परंतु फलंदाजांनी केलेली कामगिरी गोलंदाजांचा हुरूप वाढविणारी ठरली आहे हेही तितकेच खरे आहे.
               या सामन्यातील भारतीय विजयाचा शिल्पकार ठरलेला मयंक अग्रवाल अनेक विक्रम रचण्यात यशस्वी ठरला आहे. या संदर्भात आपण मागच्या लेखात आढावा घेतलाच आहे. तरीही मयंकचा एक विक्रम आपल्याला सांगणे राहून गेले होते. मयंकने त्याच्या २४३ धावांच्या खेळीत ८ षटकार मारले. भारताकडून एका कसोटी डावात सर्वाधीक षटकार मारण्याचा विक्रम सन १९९४ मध्ये लखनौ येथे श्रीलंकेविरूध्द खेळताना तडाखेबंद सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धूने रचला होता. त्या डावात सिध्दूने ८ षटकार ठोकले होते. त्या विक्रमाशी मयंकने बरोबरी साधत विक्रमांच्या पुस्तकात झेप घेतली.
                 सन १९५५-५६ मध्ये भारताचे तत्कालिन सलामीवीर विनू मंकड यांनी एका वर्षात दोन द्विशतके ठोकली होती, त्या पराक्रमाची बरोबरी मयंकने दोन द्विशतके ठोकून केली. यापूर्वीच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत मयंकने २१५ धावा काढल्या होत्या.
                 या विजयाबरोबरच भारताने बांगलादेशविरूध्द विजयाचा षटकार ठोकला. इंदोर मध्ये भारताचा हा सलग दुसरा कसोटी विजय असून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलाही भारताचा सलग सहावा विजय ठरला आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग सहा सामने जिंकण्याचा कारनामा साधला होता.
               बांगलादेशवर डावाने मिळविलेला विजय कर्णधार कोहलीला इतर भारतीय कर्णधारांच्या तुलनेत विराट अंतरावर घेऊन गेला. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्वाधिक १० वेळा प्रतिपक्षाला डाव व धावांच्या अंतराने हरविले आहे. यापूर्वी अशी कामगिरी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात ९ वेळा तर मोहम्मद अझहरूद्दीनच्या कप्तानीमध्ये ८ वेळा भारतीय संघाने केली आहे.   
                भारताचा विश्वसनीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनने भारतीय खेळपट्टीवर २५० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी अनिल कुंबळेने ३५० व हरभजन सिंगने २६५ परदेशी फलंदाजांना मायभूमीत बाद केले. विशेष म्हणजे हे तिघेही फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे हल्ली मोठया प्रमाणात विक्रमही भारतीय संघाच्या प्रेमात पडायला लागलेत असं म्हंटलं तरी वावगं ठरू नये.

No comments:

Post a comment