तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

सामाजिक व शैक्षणिक कार्याची "जाणीव"मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईतील जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेने पालघर जिल्ह्यातील भारोळ या जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळकरी मुलांसाठी दिनांक ११ व १२ जानेवारी २०२० रोजी बाल कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते.स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी भागातील मुलांना शिक्षणासोबत खेळाचेही महत्व समजावे हे त्या मागचे उद्दिष्ट होते. शनिवार ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांनी याची सुरुवात झाली. साधारण २५० हून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांसोबत ४०० ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमांमध्ये शाळकरी मुलांनी विविध नृत्याविष्कार सादर केले तसेच स्वयंसेवकांनी देखील त्यामध्ये हिरीरीने सहभाग घेतला. यानंतर कार्यक्रमाची सांगताही गावकरी महिलांनी आदिवासी तारपा नृत्याने केली. लोकमत मराठी वृत्तपत्र या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.

दुसऱ्या दिवशी मुलांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र परब, भारोळ जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक मनोज राऊत, उपमुख्याध्यापक रजनी कुडू, साइन पोस्ट इंडियाचे अमर नडगेरी तसेच लोकमत वृत्तपत्राचे प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांनी विद्यार्थ्याना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत मैदानी खेळाविषयी मार्गदर्शन केले. यात साठ्ये महाविद्यालयाच्या रासेयोच्या स्वयंसेवकांनी शाळकरी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देत आयोजकांना सर्व खेळ शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी बहुमूल्य सहकार्य केले. शाळेत गावकरी मुलांचे देखील क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते यामध्ये गावातील 44 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. या खेळांमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, कॅरम, चमचा गोटी, लंगडी अशा विविध क्रीडा प्रकारांचा यात समावेश होता. यात 190 हून अधिक शाळकरी मुलांनी सहभाग घेतला होता. सर्व विजेत्या स्पर्धकांना व संघांना प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह व पदके देऊन गौरविण्यात आले. साइन पोस्ट इंडियाने सीएसआर अंतर्गत या कार्यक्रमास आर्थिक सहाय्य केले होते. कुठेतरी आदिवासी भागातील मुलांना शाळेत येण्याची गोडी वाढावी आणि अभ्यासासोबत खेळाचे तसेच व्यायामाचे महत्व समजावे हा त्यामागील प्रामाणिक हेतू होता. या पारितोषिक वितरण सोहळ्यास जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सभासद, हितचिंतक, साठ्ये महाविद्यालयाचे स्वयंसेवक तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, गावकरी, शाळेचे विद्यार्थी व तरुण वर्ग असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. खरंतर या सर्वांच्या मदतीमुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला व असेच सामाजिक व शैक्षणिक कार्य या पुढेही अजून मोठ्या प्रमाणात सुरू ठेवू असा आशावाद संस्थेच्या प्रमुखांनी सांगितला.

No comments:

Post a comment