तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

दुखापतींमुळे शिखर धवनची कारकिर्द धोक्यात ?


               कोणत्याही खेळातील खेळाडूसाठी त्याची शारिरीक तंदुरूस्ती किती महत्वाची असते हे त्या खेळाडू इतके कुणालाच माहीती नसते. सामन्यापूर्वी ट्रेनिंग सेशनमध्ये घाम गाळावा लागतो. कर्णधार व प्रशिक्षकांच्या नजरेत बसेल इतपत स्वतःला सिध्द करावे लागते. जीममध्ये कठोर मेहनत करावी लागते. त्यानंतरच मिळते शारिरीक लवचिकता, भन्नाट वेग व मानसिक एकाग्रता. या सर्व बाबींचा संगम झाल्यास एक तंदुरूस्त खेळाडू तयार होतो व त्यानंतर घडतात पराक्रम, विश्वविक्रम ! गेल्या काही दिवसात खराब तंदुरूस्तीमुळे अनेक चांगल्या खेळाडूंची कारकिर्द बरबाद होताना आपण बघितलेच आहे. एखादी जखम खेळाडूची कारकिर्द कशी धोक्यात आणते. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतीय संघातला डावखुरा  सलामीवीर शिखर उर्फ गब्बर " धवन."
            शिखर धवनला गेल्या वर्षभरात झालेल्या विविध दुखापतींनी कसे सतावले त्यामुळे त्याच्या खेळात व्यत्यय आला. चांगल्या फॉर्मला गालबोट लागले.परिणामतः कमालीच्या प्रतिस्पर्धेमुळे संघातील स्थान धोक्यात आले. प्रथम अंगठा, नंतर घोटा व आता खांदा. या महत्वाच्या अवयवांना झालेल्या दुखापतींनी शिखर पुरता बेजार झाला आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध संपन्न झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना धवनच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे फलंदाजीलाही जाऊ शकला नाही. त्या सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात रोहीत सोबत राहुलला करावी लागली. भारताने जिंकलेल्या त्या सामन्यात शिखरच्या फलंदाजीची गरज भासली नाही. परंतु शिखरच्या दुखापतीने सर्वांनाच स्तंभित केले.
             शिखर धवनच्या मागे लागलेल्या दुखापतींच्या ससेमिऱ्याची कहाणी थोडक्यात बघूया. बंगलुरूच्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना पाचवे षटक सुरू होते त्यावेळी धवन कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार अरोन फिंचने मारलेला एक जोरकस फटका डाईव्ह मारून आडवताना त्याच्या डाव्या खांद्याला जोरदार दुखापत झाली. त्यावर वैद्यकीय उपचार केले गेले. परंतु आगामी होऊ घातलेल्या न्यूझिलंडच्या भरगच्च दौऱ्यावरील संघातील शिखरचे स्थान धोक्यात आले आहे.
             मागील सहा महिन्यात धवनला झालेली ही तिसरी मोठी दुखापत होय. चौतीस वर्षीय हा फलंदाज जसं संघात पुनरागमन करतो तसी त्याला नवीन दुखापत आपल्या जाळ्यात घेेेरते. जून २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी साकारली होती. त्या खेेळी दरम्यान ऑस्ट्रेेलियाचा जलदगती गोलंदाज नाथन कुल्टर नाईलचा एक वेगवान चेंडू त्याच्या अंगठ्यावर लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला विश्ववचषक स्पर्धेला मुकावे लागले.
           या दुखापतीतून सावरून मुख्य संघात परतण्यापूर्वी शिखर मुश्ताक अली टि-२० स्पर्धेत खेळत असताना दुखापतीने पुन्हा एकदा त्याला पछाडले. त्या स्पर्धेतील एका सामन्यात धाव घेताना त्याने डाईव्ह मारली असताना पायाला बांधलेल्या पॅड मधील एक लाकडाचा तुकडा निघाला व त्याच्या घोटयात घुसला. ते लाकूड काढण्यासाठी ऑपरेशन करावे लागले. त्यावेळी २५ टाकेही घालावे लागले. या दुखापतीने विंडीजविरुद्ध त्याला संघाबाहेरच बसावे लागले.
               ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करताना पहिल्या सामन्यात ७४, दुसऱ्या सामन्यात ९६ धावा करत जोरदार मुसंडी मारली. सर्वांना वाटलं गब्बर आपल्या जुन्या लयीत आला परंतु दुष्ट दुखापतीने त्याला परत आपल्या कवेत घेतले. यामुळे त्याच्या शरीरालाच नव्हे तर कारकिर्दीलाच तडा गेला. 
             धवनला सतत होत असलेल्या दुखापतींमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला बाधा उत्पन्न होत असून त्याची सोन्यासारखी कारकिर्द धोक्यात आली आहे. त्याला सतत होत असलेल्या दुखापतीच त्याच्या दुश्मन बनल्या असून त्यांच्यामुळेच त्याच्या कारकिर्दीला अडथळे येत आहेत. " या सर्व अडचणीतून सावरण्यास परमेश्वर त्याला बळ देवो " हिच त्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरेल !
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
 प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment