तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

बापू नाडकर्णी धावा रोखण्यातले महारथी          रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी हे  बापू नाडकर्णी या नावानेच सर्वत्र ओळखले जायचे. ४ एप्रिल १९३३ रोजी तत्कालीन बंबई प्रेसिडन्सीच्या नाशिक परण्यात जन्माला आले. डाव्या हाताने फलंदाजी व मंदगती ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजी करण्यात त्यांचा हात उजवा होता. अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी ही त्यांची खासीयत होती. तासन तास एकाच टप्प्यावर गोलंदाजी करून फलंदाज कितीही सराईत असला तरी त्याला वेसण घालण्यात ते वाकबगार होते. त्यांच्या याच हातोटीमुळे ते अतिशय कमी धावा खर्च करायचे. भले त्यांना बळी कमी मिळायचे परंतु फलंदाजांना ते ज्या पध्दतीने बांधून ठेवायचे त्याचा फायदा दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना व्हायचा. परिणामतः फलंदाज त्या गोलंदाजांवर हल्ला करायचे व बाद व्हायचे. म्हणजे चावायचं बापूजींनी व गिळायचं दुसऱ्या सहकारी गोलंदाजांने. शेवटी फायदा भारतीय संघाचाच व्हायचा.

               बापू नाडकर्णी यांचं मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. १६ ते २१ डिसेंबर १९५५ रोजी न्यूझीलंड विरोधात दिल्लीमध्ये जो कसोटी सामना झाला त्या सामन्यातून बापू नाडकर्णी यांनी क्रिकेटविश्वात पदार्पण केले. त्यांच्या गोलंदाजीच्या विशेष शैलीमुळे त्यांची क्रिकेटविश्वात वेगळीच ओळख निर्माण झाली होती. आपली खास ओळख निर्माण करणारे बापू नाडकर्णी यांचे  मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने क्रिकेटविश्वातला एक तारा निखळला आहे.   

              आंतरराष्ट्रीय सामन्यात सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी यांची ख्याती होती. कसोटीत सलग २१ षटकं निर्धाव (मेडन) टाकण्याचा विश्वविक्रम बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे. इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात बापू नाडकर्णी यांनी ३२ षटकं टाकली होती. त्यापैकी २७ षटकं निर्धाव होती. ३२ षटकांच्या गोलंदाजीत त्यांनी अवघ्या पाच धावा दिल्या होत्या.

          जगातल्या सर्वकालीन कंजुष गोलंदाजांमध्ये बापू नाडकर्णी यांचा चौथा क्रमांक लागतो. इंग्लंडचे विल्यम एटव्हेल, इंग्लंडचेच क्लिफ ग्लॅडव्हिन आणि दक्षिण अफ्रिकेचे ट्रेव्हर गॉडर्ड हे तिघे आघाडीवर आहेत. बापू नाडकर्णी अष्टपैलू खेळाडू असूनही क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले ते त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत. बापू आपल्या गोलंदाजीत कधीही चूक करत नसत असे  क्रिकेटचे जाणकार सांगतात. प्रथम श्रेणी आणि कसोटी सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी पाहिल्यावर अनेकांनी त्यांना सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज म्हणून मानले आहे.


          खेळपट्टीवर एक नाणे ठेवून सलगपणे ते ५० वेळा उडविणारे खेळाडू म्हणूनही बापू प्रसिद्ध आहेत. सन १९६०-६१ मध्ये पाकिस्तान विरूद्ध कानपूर येथील सामन्यात त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण ३२ षटकात २४ निर्धाव २३ धावा ० बळी असे होते.  तर पुढील दिल्लीच्या सामन्याचे चित्र ३४-२४-२४-१ असे होते. इंग्लंड विरुद्ध १९६४ साली तत्कालीन मद्रास येथे झालेल्या सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी ३२-२७-५-० अशी होती. यातही बापूंनी २१ षटके सलगपणे निर्धाव टाकली आहेत. 

              सन १९५५ ते ६८ या कालखंडात ते कसोटी खेळले. त्यांची धावा देण्याची इकॉनॉमी होती १.६७, जी जगातल्या कोणत्याही गोलंदाजा पेक्षा कमी आहे. बापू त्यांच्या कारकिर्दीत ४१ कसोटी खेळले. त्यात २५.७० च्या सरासरीने १४४ धावा काढल्या. त्यात एक शतक व ७ अर्थशतकांचा समावेश आहे. नाबाद १२२ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. गोलंदाजीतही २९.०७ च्या सरासरीने ८८ बळी घेवून आपल्या अष्टपैलूत्वाची झलक त्यांनी दाखविली. या दरम्यान डावात ५ बळी चार वेळा तर कसोटीत १० बळी एकदा घेण्याचा प्रराक्रमही केला.४३ धावात सहा बळी ही त्यांची उत्कृष्ठ आकडेवारी होती. शिवाय २२ झेलही त्यांच्या हाती लागले.

            प्रथम श्रेणीचे १९१ सामने खेळून ८८८० धावा, १४ शतके, ४६ अर्धशतके, २८३ नाबाद सर्वोच्च खेळी व ५०० बळी, १४० झेल डावात ५ किंवा अधिक बळी १९ वेळा तर सामन्यात दहा बळी एकदा घेतले. १७ धावात ६ बळी अशी त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

         अशा या महान अष्टपैलू खेळाडूने भारतीय क्रिकेटला खूप चांगले योगदान दिले. जीवनमरणाच्या खेळातही त्यांनी ८७ वर्षांचे आयुष्य जगून क्रिकेट व जीवनाचा चांगला आस्वाद घेतला. अखेर परम सत्य असलेल्या मृत्यूने त्यांना आपल्या जाळ्यात खेचलेच. अशा या हरहुन्नरी क्रिकेट तपस्वीस भावपूर्ण आदरांजली व मानाचा मुजरा !!!
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
 प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२८२.

No comments:

Post a comment