तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

संत वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यात गहिनीनाथ गडावर लाखो भक्तांनी हात उंचावून दिले लेकीला आशीर्वाद!


वंचितांचे अश्रू पुसण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू - पंकजाताई मुंडे

संत वामनभाऊंच्या प्रेरणेमुळेच बीड जिल्हयाची सेवा करण्याचे भाग्य

पाटोदा (प्रतिनिधी) :- दि. १७ ------- समाजातील वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याची शिकवण लोकनेते मुंडे साहेबांनी आम्हाला दिली आहे, त्यामुळे कोणतेही पद किंवा  सत्ता असो वा नसो वंचितांचे अश्रू पुसण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू. संत वामनभाऊ महाराजांची एक भक्त म्हणून या गडावर मी नेहमी येते व पुढेही येतच राहणार आहे, त्यांच्या प्रेरणेमुळे पांच वर्षात जिल्हयाची सेवा मला करता आली, ही सेवा अशीच पुढे करण्यासाठी तुमच्या मनातील माझे स्थान कायम ठेवा अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी भावना व्यक्त करताच गहिनीनाथ गडावर जमलेल्या लाखो भक्तांनी त्यांच्या भावना जपत हात उंचावून लेकीला  आशीर्वाद दिले. 

  संत वामनभाऊ महाराज यांचा ४४ वा पुण्यतिथी सोहळा लाखो भक्तांच्या साक्षीने आज गहिनीनाथ गडावर मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज,  खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, आ. बाळासाहेब आजबे, बाळासाहेब मुरकूटे आदी यावेळी उपस्थित होते. 

  पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, संत वामनभाऊ यांचे समाजाप्रती असलेले कार्य खूप मोलाचे व प्रेरणादायी आहे, त्यांच्या विचाराने वाटचाल करत असताना गेल्या पांच वर्षात मी प्रामाणिकपणे जिल्हयाची सेवा केली व पुढेही करत राहणार आहे. समाजातील वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याची शिकवण लोकनेते मुंडे साहेबांनी आम्हाला दिली, त्यासाठीच त्यांनी मला राजकारणात आणले. गडाविषयी असलेली श्रध्दा व परंपरा पुढे चालू ठेवण्याचे भाग्य त्यांच्यामुळेच मला मिळाले. गडाची एक भक्त म्हणून सत्तेच्या माध्यमातून केवळ गहिनीनाथ गडच नाही तर जिल्हयातील विविध गड व तीर्थक्षेत्रांचा विकास केला,  न मागता निधी दिला. जलयुक्त शिवार असो, रस्ते असो की पीक विमा, वेगवेगळ्या माध्यमातून जनतेची सेवा केली. जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जनजागृती केली, ज्याचा चांगला परिणाम आज दिसत आहे. 

तेच प्रेम, तोच जिव्हाळा

पंकजाताईंचे गडावर आगमन होताच कांही महिलांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांना गराडा घातला, यावेळी त्यांना पाहताच महिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत, एवढे प्रेम व जिव्हाळा  त्यांच्या डोळ्यात हो, या प्रसंगाने स्वतः पंकजाताई हया भारावून गेल्या. याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, आयुष्यात अनेक संघर्ष वाट्याला आले, साहेबांच्या जाण्याचे दुःख फार मोठे होते पण स्वतःच्या अश्रूपेक्षा वंचितांचे अश्रू पुसण्याचे काम केले, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका, धीर सोडू नका, सदैव तुमच्यासाठीच मी काम करत राहणार आहे. गोड बोलणारापेक्षा खरं बोलणाराच्या मागे उभे रहा. मला कशाचीही अपेक्षा नाही फक्त तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत असे त्या म्हणाल्या. दरम्यान, येत्या २७ जानेवारी रोजी मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न व इतर मागण्यांसाठी आपण औरंगाबाद येथे लाक्षणिक उपोषण करणार आहोत, जन सामान्यांच्या प्रश्नांसाठी भविष्यातही कायम लढत राहू असे त्या म्हणाल्या.

गडाची परंपरा जपणार - खा. प्रितमताई

यावेळी बोलतांना खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी संत वामनभाऊ महाराजांच्या आशीर्वादाने गडाची महती दिवसेंदिवस वाढतच असल्याचे सांगितले. मुंडे साहेबांची गडावर येऊन आशीर्वाद घेण्याची परंपरा आम्ही कायम जोपासू. गड परिसराच्या विकासासाठी पंकजाताई यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला, इथल्या भक्तांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असे सांगितले. 

  प्रारंभी मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी पंकजाताई व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी संत वामनभाऊ महाराजांचे दर्शन घेवून आशीर्वाद घेतला. यावेळी मंदिरात  जमलेल्या महिला भाविकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment