तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

कांगारूंसमोर भारतीयांचे सपशेल लोटांगण


          मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मकर संक्रांतीच्या पूर्व संध्येला दोन माजी विश्वविजेते व आजच्या घडीला तुल्यबळ म्हणून गणले जाणारे यजमान भारत व पाहुणा ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना झाला. भारताला या सामन्यातला संभावित विजेता म्हणून अनेक क्रिकेट पंडितांनी पहिली पसंती दिली होती. भारत या सामन्यात जिंकला तर नाहीच परंतु गेल्या १५ वर्षात झाला नाही इतका लाजिरवाणाच नव्हे तर किळसवाणा पराभव या सामन्यात झाला.
          सन २०१९ च्या विश्वचषकातही भारतच संभावित विजेता होता. साखळीत अव्वलस्थानी राहून त्यांनी ते सिध्दही केलंच. परंतु उपांत्य फेरीत नियोजन शुन्यतेमुळे हातातोंडाशी आलेला विश्वकरंडक दुसऱ्याच देशाच्या हातात बघण्याची नामुष्की तमाम भारतीयांवर आली होती. त्यानंतरही नाराज झालेल्या भारतीय क्रिकेट रसिकांनी मुजोर भारतीय खेळाडूंचा लाड करण्याचे बंद केले नाही. थोडीफार डागडुजी करून अपयशाचे खापर फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरच्या माथी फोडून संघ कॅरेबियन वारीवर गेला. तेथे दुबळ्या विंडीजचा क्रिकेटच्या तिनही प्रारूपात फडशा पाडला.
             नंतर भारतात आलेल्या कमजोर द. आफ्रिकेलाही मात दिली. बांगलादेशलाही चारीमुंडया चित केले. नंतर विंडीज व श्रीलंकेला लोळविल्याने भारतीय संघाला आकाश ठेंगणे झाले होते. त्यातच संघाची पुनर्रचना करून अचूक बांधणी केलेला ऑस्ट्रेलियन संघ भारत वारीवर आला. कांगारूंनाही भारताने किती हलक्यात घेतले हे आपण सर्वांनीच अनुभवले. भारताच्या अतिआत्मविश्वासाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करताना कांगारूंनी भारतीयांची हवाच काढून घेतली व मागील सहा महिन्यात मिळविलेले विजय केवळ दुबळ्या संघांवर मिळविले असल्याचे सिद्ध करून भारताचा सदर पराक्रम " वासरात लंगडी गाय शहाणी " या सदरात ढकलला.
            मुळात वरकरणी भक्कम दिसणारी फलंदाजीच भारताची पुन्हा एकदा कमजोर बाब ठरली. प्रस्थापित रोहीत शर्माचा साथीदार कोण या गडबडीत धवन व राहुलला खूष ठेवण्याच्या नादात कर्णधार कोहलीने संघाची घडीच बिघडून टाकली. रोहीत अपयशी ठरला व संघातील स्थान टिकवण्यासाठी धवन व राहुलने स्वार्थी खेळी खेळल्या परिणामतः धावगती घसरली. नंतर कोहलीला बदललेला क्रम रास आला नाही. तिच गत श्रेयस अय्यरची झाली. मग कांगारूंनी जोरदार फास आवळत भारताची धावसंख्या वाढू दिली नाही.
            कर्णधार अरॉन फिंच व अनुभवी डेव्हीड वॉर्नरने कागदावरील मजबूत भारतीय गोलंदाजीचे पिसे काढताना आपल्या संघ सहकाऱ्यांना आरामात बसण्याची संधी देत १o गड्यांनी बाजी मारत भारताला जोरदार चपराक दिली. इतकेच नाही तर मालिकेत परतण्याचे दरवाजे बंद करून चावी आपल्या हाती घेतली. कमजोर संघांना शेपूट घालून पळायला लावणारे तेच भारतीय गोलंदाज वॉर्नर - फिंचचे नोकर असल्यासारखे वाटत होते. यावरून भारतीय संघाची तयारी किती कुचकामी झाली आहे हे सिद्ध होते.
         भारतीय संघ सतत प्रयोग करत असतो. कमजोर संघांविरूद्ध केलेले प्रयोग ग्राहय धरले जातात व चुका माफही केल्या जातात. परंतु बलाढय संघाविरूध्द पूर्ण तयारीनिशी जायचे असते हे कोटयावधी रुपये मानधन घेणाऱ्या शास्त्री बुवा व निष्क्रीय प्रशिक्षक मंडळीला कळू नये ही फार मोठी खेदाची व मुर्खपणाची गोष्ट आहे. असाच प्रयोग विश्वचषकात उपांत्य सामन्यात मॅचविनर धोनीला सातव्या क्रमांकावर पाठविण्याचा झाला होता. शास्त्रीबुवा यातून काहीच शिकले नसल्याचे जाणवते.
        ठोकर लागल्याशिवाय जागे व्हायचे नाही व आपल्या चुकांचे खापर दुसऱ्याच्याच माथी फोडायचे ही शास्त्री - कोहलीची रणनिती येथून पुढे क्रिकेट रसीक मान्य करतील अशी सुतरामही शक्यता नाही. तेंव्हा खास करून शास्त्रीबुवांनी अलर्ट व्हावे अन्यथा क्रिकेट रसिकांच्या उद्रेकाला तेच जबाबदार असतील.
  लेखक : - दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment