तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

भारत - ऑस्ट्रेलिया वनडे मालिकांचा थोडक्यात आढावा


         १४ जानेवारी रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एक दिवशीय सामन्यांच्या छोटेखानी मालिकेतला पहिला सामना रंगेल. यामुळे प्रेक्षकांना दोन अव्वल संघातील रोमांचक क्रिकेट अनुभवता येईल. याबरोबरच भारताने जर हा सामना जिंकला तर  मायभूमीवर २०० वनडे जिंकण्याचा पराक्रम घडेल. यापूर्वी केवळ ऑस्ट्रेलियानेच मायभूमिवर सर्वाधिक २८० सामने जिंकण्याचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. प्रस्तुत लेखात भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांच्या आकडेवारीवर एक दृष्टीक्षेप टाकू या.
          भारत भूमीवर या दोन तुल्यबळ संघात एकूण ११ एक दिवशीय सामन्यांच्या मालिका खेळल्या गेल्या आहेत. यामध्ये मात्र ऑस्ट्रेलियाचे पारडे ६ - ५ असे वरचढ राहीले असून उभयतांतील ही बारावी मालिका कोणाच्या झोळीत पडते हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
             या पारंपारीक प्रतिस्पर्ध्यात आजवर १३७ सामने झडले असून कांगारूंनी ७७ तर भारताने ५० सामन्यात बाजी मारली. १० सामने कोणत्याही
निकालावीना संपले. भारतात ६१ वेळा हे दोन संघ आपसात भिडले. त्यातील २९ ऑस्ट्रेलियाने व २७ सामने भारताने जिंकले तर पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. विश्वचषक स्पर्धेपूर्वी सन २०१९ मध्ये भारतात हे दोन संघ पाच सामन्यांची मालिका खेळले. तिच्यात ऑस्ट्रेलिया ३-२ ने सरस ठरले.
            आतापर्यंत केवळ दोनच संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ७५० पेक्षा विजय मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १०३१, इंग्लंडने ७९९ तर भारत ७४८ यांचा क्रम लागतो. भारताने जर या मालिकेत २ सामने जिंकले तर मालिकेत विजय होईलच शिवाय ७५० आंतरराष्ट्रीय विजय मिळविणारा जगातला तिसरा संघही ठरेल.
            भारताने आजवर क्रिकेटचे तीनही प्रारूपे वनडे, टेस्ट व टि - २० मध्ये ७४८ विजय मिळविले त्याचा तपशील थोडक्यात - कसोटीत १५७ विजय, एकदिवशीय सामन्यात ५११ तर टि- २० मध्ये ८० सामन्यात विजयश्री मिळविली आहे.
            ऑस्ट्रेलियाविरूध्द भारत १४,१७ व १९ जानेवारी २०२० रोजी अनुक्रमे मुंबई, राजकोट व बंगलोर येथे दिवस रात्र सामने खेळणार असून सदर सामने दुपारी २ वाजता सुरू होतील.

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
 प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment