तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन लढ्याला यश, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडी जाहीर!



बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी दि.०४ रोजी झालेल्या मतदानानंतर त्या पाच सदस्यांच्या मुद्द्यावरून राखीव ठेवलेला निकाल आज उच्च न्यायालयाच्या आदेशाने जाहीर करण्यात आला. अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ.शिवकन्या शिवाजी सिरसाट तर उपाध्यक्ष पदी बजरंग सोनवणे यांची अधिकृत निवड आज जाहीर करण्यात आली.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात डेरेदाखल झालेल्या पाच सदस्यांचे मतदानाचे अधिकार गोठवलेले असल्यामुळे ४ जानेवारीला झालेल्या निवडीनंतर तो निकाल बंद पाकिटात ठेवण्यात यावा व आज दि. १३ रोजी न्यायालयाच्या समोर तो उघड करण्यात यावा असे आदेश दिले होते. त्यानंतर आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निकालाचे ते बंद पाकीट उघड करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीच्या बाजूने ३२ तर भाजपच्या बाजूने २१ मते असल्याचे निष्पन्न झाले. मतदानाचा अधिकार गोठवलेल्या त्या ५ सदस्यांचा विचार केला तरीही अध्यक्ष व उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच विजयी ठरतात या निकषावर न्यायालयाने निकाल जाहीर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे व सहकाऱ्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी व न्यायालयाने दिलेला निकाल पाहता धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील या लढ्याला यश आले असेच म्हणावे लागेल. 

दरम्यान त्या पाच सदस्यांचे मतदान करण्याचे अधिकार गोठवलेले असले तरी त्यांच्या रिट याचिकेला उच्च न्यायालयाने दाखल करून घेत लवकरात लवकर त्याबाबतही सुनावणी होईल असे म्हटले आहे.  परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जुळवलेले संख्याबळ पाहता अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या आज घोषित करण्यात आलेल्या निवडी कायम राहतील असेच दिसते.

दरम्यान बीडच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट ह्या येत्या दोन दिवसात अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असून उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आज (दि. १३) रोजी पदभार स्वीकारला आहे.

No comments:

Post a comment