तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

गुलामगिरीविरुद्ध लढण्याचे बळ देणारी कविता : क्रांतिसूर्याच्या दिशेने
    महानगरीय, ग्रामीण, स्त्रीवादी, मार्क्सवादी, आदिवासी, धनगरी, भटक्या विमुक्तांचे साहित्य, दलित साहित्य असे अनेक प्रवाह साहित्यात निर्माण झाले आहेत. दलित साहित्य हे आंबेडकरी विचाराचे, आंबेडकरी प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य म्हणून संबोधले जाते. समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि मानवतेचा पुरस्कार करणारे साहित्य हे आंबेडकरी चळवळीतील लोकांना अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी या विचाराने, या प्रेरणेने वाङ्मयनिर्मिती केली. आजही कथा, कविता, आत्मकथन, नाटक इत्यादी प्रकारात मोठ्या प्रमाणात मानवी मूल्यांना दृष्टीसमोर ठेवून लेखन केले जात आहे. याचेच उदाहरण म्हणून मी वाचलेला रानबा गायकवाड लिखित एक महत्त्वाचा कवितासंग्रह 'क्रांतिसूर्याच्या दिशेने' याचा थोडक्यात परिचय करून घेऊया.


      महाराष्ट्रातील बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांच्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महामानव राष्ट्रपिता महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि रयत शिक्षण संस्थेचे आधारवड कर्मवीर भाऊराव पाटील यांना 'क्रांतिसूर्याच्या दिशेने' हा कवितासंग्रह अर्पण करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे की, 'सत्याग्रह, आंदोलने, चळवळी, संविधानाची निर्मिती आणि बौद्ध धर्मात प्रवेश यामुळे भारतीय अस्पृश्यांना भान आले. माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा निर्माण झाली'. ही कविता त्याचेच फलित म्हणावे लागेल. या संग्रहातील कविता क्रांतीची भाषा बोलणारी, माणुसकी शिकविणारी, स्त्रियांना आत्मभान देऊन गुलामगिरीविरुद्ध लढण्याचे बळ पुरविणारी आहे. भारतीय संविधानाने दिलेले सामाजिक एकता आणि न्यायभाव जपणारी, अन्याय-अत्याचार धुडकावून लावणारी क्रांतिकारी भाषा बोलणारी ही कविता आक्रस्ताळेपणा अजिबात करत नाही. जाती, धर्माच्या नावाखाली उच्छाद मांडणारांच्या मानगुटीवर बसणारी ही कविता खरंच क्रांतिसूर्याच्या दिशेने निघाली आहे. 


     कधी दगडफेक, कधी जाळपोळ, कधी मारामारी, कधी खून खराबा यांसारख्या अनेक घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत आणि त्या आपल्या देशात वारंवार घडताना पाहून कवी रानबा गायकवाड अस्वस्थ होतात. रस्त्यावर पडलेला रक्ताचा सडा पाहून ते सवाल करतात की, सांडलेल्या रक्ताची जात कशी ओळखणार? 


        शेतकऱ्यांविषयी फुकटचा कळवळा करणाऱ्या पुढाऱ्यांना चपराक लावणारी 'कळवळा' कविता उल्लेखनीय आहे. कवी रानबा गायकवाड म्हणतात,

     ज्यांच्या बापाने कधी

     केली नाही शेती

     त्यांची शेतकरी नेता 

     म्हणून ख्याती


     हाती धरता

     येत नाही कोयता

     तो ऊसतोड कामगारांचा

     झाला नेता


शेतकरी आणि ऊसतोड मजुरांची व्यथा मांडणारी कविता, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी कविता, दीन- दुबळ्यांच्या प्रश्नांना वाचा देणारी कविता, जाती-धर्माच्या नावाखाली भरडल्या गेलेल्या वंचित बहुजनांची वेदना, तडफड मांडणारी कविता, विषमतेला ठेचणारी आणि हिंसक प्रवृत्तीच्या मुळांना पोखरून काढणारी कविता 'क्रांतिसूर्याच्या दिशेने' या संग्रहात रानबा गायकवाड यांनी वाचकांसमोर ठेवली आहे. वैज्ञानिक माध्यमातून होणाऱ्या अवैज्ञानिक चर्चा, फसव्या जाहिरातींवर होणारा लोकांचा खर्च, सामान्य जनतेला गरिबीच्या गराड्यात ढकलून मंदिरांना कोट्यवधी रुपयांचे दान करणाऱ्या लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत त्यांनी आपल्या 'अस्वस्थ' कवितेतून व्यक्त केले आहे.


भीमरावजी आंबेडकरांच्या जन्मामुळे बहिष्कृत वर्गाला नायक मिळाला. गुलामीतली जनता अन्यायाविरुद्ध पेटून उठली. शिकून सवरून लढायला लागली. सर्व प्रकारच्या रीती-रिवाज, रूढी-परंपरा आणि जाचक बंधने झुगारून क्रांतिसूर्याच्या दिशेने वाटचाल करायला लागली. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराने क्रांती घडवून आणली. माणसाच्या स्वार्थी, नीच आणि नाकर्तेपणावर सडकून टीका करणारी कविता यात आहे. पुस्तकांतच नीतिमत्तेच्या गोष्टी वाचणारे मात्र प्रत्यक्षात उलट वागतात. जातीयता संपवण्याच्या गप्पा मारणारे संकुचित वृत्तीआणि जातीय मानसिकता बदलायला तयार नसतात, माणुसकीच्या फुशारक्या मारणारी लोकं माणुसकी सोडून वागू लागतात हीच शोकांतिका आहे. कवी याबाबत लिहिताना कसर ठेवत नाही; या संग्रहातील कविता वाचताना याचा प्रत्यय येतो. वास्तवाचा वेध घेणारी कविता, संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणारी, भविष्याचाही अचूक वेध वर्तवते. एकूण ५८ कवितांचा हा संग्रह प्रत्येकाने आपापल्या संग्रही ठेवावा असाच आहे. समर्पक मुखपृष्ठ हे बाह्यरूप तर अल्पाक्षरत्व हे कवितेचे गुणवैशिष्ट्य! या संग्रहाला कवयित्री शांता शेळके पुरस्कार मिळालेला आहे. वाचकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. 

No comments:

Post a comment