तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

श्रीसमर्थ पादुका दौरा ही प्रबोधनाचीच चळवळ


- ह.भ.प.भरतबुवा रामदासी

       नगर - सज्जनगड येथील श्रीरामदासस्वामींचा मठ ३७० वर्षांचा इतिहास व परंपरा असलेला असून या मठामधून प्रतीवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाशष्ठीपासून श्रीसमर्थ रामदास स्वामी पादुका दौरा सुरू होतो. हा दौरा म्हणजे प्रबोधनाची चळवळच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांनी केले.
         येथील गायत्री मंदिरात श्रीसमर्थ पादुका आल्याने सुरू झालेल्या किर्तन सोहळ्यात प्रभाते मनी राम चिंतीत जावा | पुढे वैखरी राम आधी वदावा ||
सदाचार हा थोर सांडून येतो |
जगी तोचि तो मानवी धन्य होतो || हा मनाचा श्लोक त्यांनी 
 निरूपणासाठी घेतला होता.
           श्रीसमर्थ पादुका दौरा सुरू असताना सकाळी होणारी भिक्षाफेरी माणसे जागवणारी आणि घराघरात रामरायाला पोहोचवणारी असते. माणसाला जागवून देहाकडून देवाकडे नेण्याचे कार्य भिक्षाफेरी प्रभावीपणे करते.अलिकडे चंगळवादामुळे माणूस देश, धर्म आणि भारतीय संस्कृती विसरत चालला आहे. आपल्या चित्ताचा विषय नारायण झाला की मग काहीही आवडत नाही. नामसाधना करताना परमेश्वराच्या प्रत्येक रूपाचे चिंतन करावे. जपाचा मूळ उद्देश जन्म-मरणाची परंपरा नष्ट करणे, पापाचा नाश करणे हाच असतो.
        पूर्वी नाडी तपासून अचूक निदान केले जायचे. आज अत्याधुनिक साधनांआधारे वेगवेगळ्या तपासण्या केल्या तरी अचूक निदान होत नाही. तपासणी केल्यानंतर तुम्हाला काय होते? असा प्रश्न डाॅक्टर करतात, असे आजच्या प्रगत युगातील शिक्षण आहे.
          आई-वडिल-वडिलधारी मंडळी अन् गुरूजनांना नमस्कार करायला शिकवते ते खरे शिक्षण. देव-धर्मावर प्रेम करायला लावते ते खरे शिक्षण. आजचे शिक्षण नोकरी आणि छोकरीसाठी होते आहे. होस्टेलमध्ये रहायचे, हाॅटेलमध्ये खायचे व हाॅस्पिटलमध्ये लोळत पडायचे. मुखाने श्रीरामाचे चिंतन करायचे नाही, हि वस्तुस्थिती आहे. पवित्र ज्ञानदानाचा विषय संपत चालला आहे. पुण्य व पाप कर्माचे फळ मिळते, हे धर्म शिकवतो. आपली आदर्श भारतीय संस्कृती पुराणात आहे. प्रत्येक कर्म ईश्वराला आवडेल असे करावे. धन्यता प्राप्त होण्यासाठी सतत परमेश्वराचे चिंतन करावे. धर्माने वागावे. जीवनात सदाचार, संस्कार, संस्कृती, धर्म महत्वाचा. सदाचाराशिवाय श्रीराम भेटतच नाही. समर्थ रामासमोर उभे राहिले की त्यांच्या डोळ्यातून खळखळ पाणी यायचे. नामदेव महाराज पांडुरंगाशी बोलत. श्रीरामकृष्ण परमहंस कालीमातेसाठी रडत असे संतांचे दाखले देत श्रध्दा कशी असावी? हे भरतबुवांनी सांगितले.
            जगातला कुठलाही धर्म कधी हिंसा, द्वेष, मत्सर, असूया, वैरभाव करायला शिकवत नाही. धर्म मानवी जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, समता, बंधुता, एकता या जीवनमूल्यांची शिकवण देतो. धर्म गंगाजलासारखा निर्मळ आहे, विशुद्ध आहे पण आज धर्माच्या नावावर माणसे राक्षसी वृत्तीने वागत आहेत. समाजात हिंसा खून, बलात्कार, अत्याचार, चालू आहे. माणूस प्रेमाने एकमेकांजवळ येत नाही. स्वार्थपरायण वृत्ती बळावत आहे. याच असुरी वृत्तीमुळे मानवता धर्माचाच ह्रास होत चालला आहे. माणूस चालत्या बोलत्या जिवंत माणसावर प्रेम करू शकत नसेल तर मग न दिसणार्‍या देवावर कसा प्रेम करणार...?
धर्म सांगतो, अमृतस्य पुत्रा: प्रत्येक जीव हा त्याच अमृततत्वातून जन्माला आला आहे. वर्तमान काळात जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद खूप बळावत आहे. संत विचारांची पणती सतत तेवत ठेवली तरच समाजात मानवता धर्माचे संवर्धन होईल. कीर्तन परंपरेची आजच्या काळात नितांत गरज आहे. कीर्तनातूनच समाजामध्ये सदाचाराचे संवर्धन घडेल.  आज खरं तर मानवता धर्माचे संवर्धन होण्याची गरज आहे. कारण मानवता लोप पावत चालली आहे. माणूस आपल्या पुरतेच बघतो आहे. वर्तमान काळातील चंगळवाद हा मानवता धर्माचाच ह्रास करीत आहे. कीर्तनकार महाराज मंडळींनी मनात आणले तर ही परिस्थिती बदलता येईल, असा विश्वास हभप भरतबुवा रामदासी यांनी व्यक्त केला.
                 जो प्रपंच आपल्याला रडवतो त्या अस्थिर प्रपंचासाठी आपण रडतो. तिथी,वार,नक्षत्रांचे रोज जीवनात उच्चारण व्हावे. त्यामुळे आयुष्य वृध्दी होते. भारतीय संस्कृतीतील हिंदू धर्मामध्ये संकल्पाविरहित कोणतेही कार्य होत नाही. धर्मपत्नीशी आदरार्थी बोलावे, हे  आपल्या संस्कृती सांगते. आज पत्नी आपल्या पतीला आरे-तुरे करते, हिच का प्रगती का? असा सवाल भरतबुवा रामदासी यांनी केला.
            संयोजन समितीतर्फे समर्थभक्त श्री.मंदारबुवा रामदासी आणि सनातन धर्मसभेचे अध्यक्ष श्री.दत्तोपंत पाठक गुरूजी यांच्या हस्ते भरतबुवा रामदासी यांना गौरविण्यात आले. किर्तनास भाविकांची अलोट गर्दी होती.

No comments:

Post a Comment