तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

राजयोगिनी डॉ.रतनमोहिनी आणि राजयोगी डॉ.शिवलिंग शिवाचार्यांचा 95 किलो गुलाब पुष्पमालेने पत्रकार संघाच्या वतीने वर्ल्ड रेकॉर्ड सत्कार


आपला कोणीच शत्रू नाही ही धारणा यशस्वी जीवनाचा मंत्र आहे-डॉ.रतनमोहिनी दादीजी
विश्‍वशांतीचा संदेश घेऊन ज्ञानाची ज्योत पेटवण्यात विश्‍वशांती यशस्वी-डॉ.अहमदपूरकर महाराज

बीड (प्रतिनिधी) :- प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जगत असताना माझा कोणीही शत्रू नाही. ही धारणा निश्‍चित करावी आणि प्रत्येकाबद्दल शुभचिंतन करावे. आपल्या सर्वांचा पालनकर्ता पिता एकच आहे. हा निश्‍चय मनात केला तर संघर्षमय जीवनात आनंदी जगण्याचा आनंद घेता येईल असा मौलिक विचार राजयोगिनी डॉ.रतनमोहिनी दादीजींनी व्यक्त केले. तर कराचीत ईश्‍वरीय संस्थेचे बाबाजींनी लावलेले रोपटे आज वटवृक्षात झाले आहे. 1940 साली त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली. एक तपस्वी व्यक्तीमत्व असल्याने समस्त जगाला विश्‍वशांतीचा संदेश देत ज्ञानाची ज्योत पेटवण्यामध्ये विश्‍वशांती समुहाला यश आले असल्याचे प्रतिपादन राजयोगी डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांनी केले. यावेळी या दोन्ही तपस्वींचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भव्यदिव्य 95 किलो गुलाब पुष्पांचा हार समर्पित करुन सन्मानित करण्यात आले.
बीड येथील सूर्या लॉन्स येथे सोमवार दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ‘नई सुबह की नई किरण’ हा सोहळा भव्यदिव्य स्वरुपात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी बालब्रह्मचारी डॉ.रतनमोहिनी दादीजी लाभल्या. तर प्रमुख अतिथी म्हणून राजयोगी बालब्रह्मचारी डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर माऊंटआबू राजस्थान येथील वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्मकुमारी गीता बहनजी, ब्रह्मकुमारी लीला बहन, मुख्य निर्देशक ब्रह्मकुमार भरतभाईजी, सोलापूर केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी सोनप्रभा बहन, बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, मार्गदर्शक संतोष मानूरकर, जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राजयोगिनी डॉ.रतनमोहिनी दादीजी म्हणाल्या, आपल्या जीवनात पित्याची किंमत ही अनमोल आहे. ही बाब कायम स्मरणात ठेवा. संघर्षमय जीवनात कोणत्याही गोष्टीचे टेंन्शन कधीच घेऊ नका. एकमेकांना भेटल्यावर दुःख जरुर जाणुन घ्या पण एकमेकांची खुशाली आणि आनंदी क्षण जरुर व्यक्त करा. हा जन्म पुन्हा येणार नाही. तेंव्हा कायम सत्कार्य आपल्या हातून करण्याचा प्रयत्न करा. पुढे बोलतांना डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, या वयात बोलणे, चालणे अवघड असते. पण ज्ञानाची ज्योत पेटवण्याचे स्वप्न अलौकिक ऊर्जा देते. मन निर्मळ असेल तर चारित्र्य संपन्न निश्‍चित राहता येते.
यावेळी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, राजनितीमध्ये अनेक कठीण प्रसंगी सातत्याने येतात. यावर मात करण्याची ऊर्जा ही अशा अध्यात्मिक कार्यक्रमातुनच मिळते.दादीजींचे आणि महाराजांचे आशिर्वचन निश्‍चितच दुःखावर मात करुन सुखाचा मार्ग मिळवण्यासाठी सुखकर राहणार आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, विश्‍वशांतीचा संदेश घेऊन बहनजी आणि भाईजींचे जगभरातील कार्य आदर्शवत आहे. त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा संकटावर मात करण्यासाठी आदर्श ठरते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले, माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझी आई आणि कुटुंब विश्‍वशांती विद्यालयामुळेच कठीण प्रसंगावर मात करू शकले. मी या परिवाराचा सदस्य असुन आज दादीजींचे अनमोल विचारांसह त्यांच्या आगमनाने बीड नगरी पावण झाली आहे. या प्रसंगी गीता दीदी म्हणाल्या, मनातील अंधार दूर करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. यासाठीच नई सुबई की नई किरण हा संकल्प आम्ही घेतलेला आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, आयुष्यात कोणी कितीही मोठे झाले तरी मानसिक सुखाशिवाय त्याच्या मोठेपणाला अर्थ राहत नाही. मनाची श्रीमंती ही अध्यात्मातुनच मिळू शकते असे प्रतिपादन केले. याप्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा ईश्‍वरीय रितीनुसार सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन आणि प्रास्तविक बीड केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी प्रज्ञा बहन यांनी केले. तर आभार वसंत बावीस्कर यांनी मानले. याप्रसंगी पत्रकार संघाने संतांच्या व्यासपीठावर दादीजींच्या 95 वाढदिवसानिमित्त आणि थोर तपस्वी डॉ.शिवलिंग शिवाचार्य यांच्या 104 व्या वाढदिवसानिमित्त तब्बल 95 किलोचा भव्यदिव्य गुलाब पुष्पहार अर्पण केल्याने जागतिक विक्रम करण्याचा योग बीड येथे आल्याने पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, मार्गदर्शक संतोष मानूरकर, जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांचा ईश्‍वरीय विश्‍वशांती परिवाराच्या वतीने व्यासपीठावरील प्रमुख महंतांच्या शुभहस्ते ईश्‍वरीय रितीने सन्मानित केले. या कार्यक्रमाला ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाचे बहनजी आणि भाईजी हजारोंच्या संख्येने तर जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment