तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणास प्रारंभ · सुनगांव व साखळी येथे प्रात्याक्षिकाद्वारे सुरूवात


            बुलडाणा, दि. 24 :  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास बुलडाणा तालुक्यातील साखळी बु व जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथून आधार प्रमाणीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सुनगांव येथे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या हस्ते, तर साखळी बु. येथे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्याहस्ते  करण्यात आला.
            जिल्ह्यातील 1 लक्ष 95 हजार 56 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुनगांव व साखळी येथील अनुक्रमे 364 व 192 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली. ही यादी संबंधित बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दोन्ही गावातील एकूण 404 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरळीतपणे सुरु आहे.  शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या दृष्टीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना सुरु करण्यात आली.
       या योजनेनुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम दोन लाखांपेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे ही कर्जमुक्ती देताना शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही याचाच अर्थ अल्पभूधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहेच शिवाय जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
            साखळी बु व सुनगांव येथील 556 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण सुरळितपणे सुरु आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची त्रुटी पूर्तता केली जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक श्री चव्हाण यांनी दिली. कर्जमुक्ती योजनेबद्दल प्रतिक्रीया देताना साखळी बु. येथील शेतकरी लक्ष्मण लहासे म्हणाले, ही कर्जमाफी काही कागदपत्रे न भरता प्रत्येक शेतकऱ्याला दिली. याबद्दल मी या सरकारचा फार फार ऋणी आहे.तसेच सुनगांव येथील शेतकरी अनिल भगत प्रतिक्रिया देताना माझे कर्ज 2016 मधील होते. आधी माफ झाले नव्हते. मात्र आता काही अडचण न येता मी यादीमध्ये नाव बघितले . या शिबीरात आल्यानंतर येथे उपस्थित कर्मचाऱ्यांना माझे आधार कार्ड दिले त्यांनी ते तपासले. अशाप्रकारे माझे कर्ज माफ झाले त्याबद्दल धन्यवाद.                      

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment