तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

वनविभागाने उधळली ‘गलोर’ची विक्री ; पर्यावरणप्रेमी सचिन भांडे यांच्या ‘गलोर हटवा, पक्षी बचाव’ मोहिमेला यश


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
महाशिवरात्रीनिमित्त परळी शहरात भरणार्‍या यात्रेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात ‘गलोर’ विक्रीसाठी आणले जातात. इतर खेळण्यांच्या साहित्याबरोबर ‘गलोर’ची विक्री केली जात असल्याने, लोकांना याचे फारसे गांभीर्य कळून येत नाही. मात्र हेच गलोर पक्षांसाठी कर्दणकाळ ठरत असल्याने पर्यावरणप्रेमी सचिन भांडे यांनी ‘गलोर हटाव, पक्षी बचाव’ ही मोहिम हाती घेतली. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत या प्रकरणाचा वाचा फोडण्याचा प्रयत्न केला असता वनविभागाने त्यास साद देत ‘गलोर’ची विक्री उधळली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परळीतील यात्रेत हजारोंच्या संख्येनी गलोर विक्रीसाठी आणले होते. यात्रेतील बहुतांश खेळणी साहित्य असलेल्या स्टॉलवर गलोर विक्रीसाठी उपलब्ध होते. जेमतेम दहा-वीस रूपये किंमत असलेले हे गलोर मुलांसाठी खेळणी म्हणून विकले जात होते. मात्र हे खेळणे नसून उपद्रवी अवजार असल्याने पर्यावरणप्रेमी सचिन भांडे यांनी गलोर विक्रीविरोधात आवाज उठविला. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांनी यात्रेतील स्टॉल प्रत्यक्ष भेटी देवून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गलोरमुळे होणारे दुष्परिणाम लोकांसमोर मांडले.
गलोरमुळे केवळ पक्षानाच नव्हे तर इतरांनाही हानी पोहचू शकते, ही बाब त्यांनी प्रकर्षाने दाखवून दिली. गलोर एकप्रकारचे हिंसक अवजारच असून, त्याची अशाप्रकारे राजेरोसपणे विक्री करणे गैर असल्याची बाब ही त्यांनी यानिमित्त उघड केली. भांडे यांच्या या मोहिमेची दखल घेत वनविभागाने तातडीने यात्रेतील गलोर विक्री करणार्‍या स्टॉल्सना भेटी दिल्या. त्याचबरोबर गलोर विक्री केली जावून नये याबाबत विक्रेत्यांना तंबी दिली. तसेच कोणी गलोरची विक्री करीत असेल तर त्याच्यावर रितसर कारवाई केली जाईल असा इशाराही याप्रसंगी दिला. त्यामुळे परळीतील यात्रेतून काही क्षणातच गलोरची विक्री बंद झाल्याने, पर्यावरणप्रेमी सचिन भांडे यांच्या मोहिमेला यश आले आहे. गलोरची विक्री कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी पुढील काळातही माझा लढा सुरूच असेल असा निर्धार भांडे यांनी याप्रसंगी व्यक्‍त केला.
---
चौकट
मानवाच्या चुकांमुळे अगोदरच पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. पक्षी हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. अशात त्याची गलोरच्या सहाय्याने शिकार केली जात असेल तर भविष्यात पक्षी फक्‍त चित्रातच बघावयास मिळणार आहे. त्यामुळे ही बाब जरी काहींना सामान्य वाटत असली तरी, पर्यावरणाची साखळी बिघडविणारे आहे. ज्याचे दुष्परिणाम भविष्यात तुम्हा-आम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे प्रत्येकांनीच या मोहिमेत सहभागी होऊन ‘गलोर’ विक्रीला व खरेदीला विरोध करावा.
- सचिन भांडे,पर्यावरणप्रेमी

No comments:

Post a Comment