तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

क्रिकेट, प्रेम व व्हॅलेंटाईन अतूट नात्याचं हृदयस्पर्शीदर्शन


                काही अपवादात्मक देश सोडल्यास सबंध जगात १४ फेब्रुवारी या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. जसा चातक पक्षी पावसाची वाट बघतो अगदी त्याच्याही पेक्षा या दिवसाशी निगडीत असलेले लोक १४ फेब्रुवारीची प्रतिक्षा करत असतात. १४ फेबुवारी हा दिवस प्रेमदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, त्या दिवसालाच व्हॅलेंटाईन डे म्हणून ओळखले जाते. वास्तविक १४ फेब्रुवारी हा जरी खास प्रेम डे म्हणून साजरा केला जात असला तरी त्याची सुरुवात आठवडाभर आधीच म्हणजे ७ फेब्रुवारीलाच होते.
                  सात फेब्रुवारी पासून सुरू होणारा हा प्रित वेडयांचा प्रेम सप्ताह दररोज वेगवेगळ्या नावांनी धामधुमीत साजरा केला जातो. फेब्रुवारीच्या ७ तारखेला रोझ डे, ८ तारखेला प्रपोज डे, ९ तारखेला चॉकलेट डे, १० ला टेडी डे, ११ ला प्रॉमिस डे, १२ ला किस डे, १३ तारखेला हग डे व १४ फेब्रुवारीला सर्वांचा बहुप्रतिक्षित व मोस्ट वाँटेड व्हॅलेंटाईन डे मोठया उत्साहाने अतिउल्हासात साजरा केला जातो. काही  अपवादात्मक परिस्थितीत याला गालबोट लागतं तो भाग अलाहिदा !
                      पुर्वीच्या तुलनेत आजच्या तरूणाईकडे प्रेमदिन साजरा करण्याच्या अनेक क्लृप्त्या आहेत. जशी विज्ञानाची प्रगती होत गेली तशी प्रेम पुजाऱ्यांजवळ या दिवसाची जाहीरात करण्याच्या नानाविध यंत्रणाही उपलब्ध आहेत. इतर गोष्टींप्रमाणे विज्ञानाची प्रगती प्रेमासाठीही पोषक व फायदेशीर ठरली आहे. इंटरनेटच्या या जमान्यात फेसबुक, व्हॉट्सप, इंस्टाग्राम, ट्वीटर, मोबाईलवरून थेट संभाषण व इतर यांत्रीक सहाय्याने या प्रित सप्ताहाचा प्रचार, प्रसार व पुकार केला जातो.
                        वरील सर्व माहिती वाचल्यानंतर आपण म्हणाल, आम्हांला तर हे सर्व माहीती आहे. मग येथे या लेखात हे लिहीण्याची काय गरज आहे ? परंतु 'असली राज की बात' ही आहे की, क्रिकेट व व्हॅलेंटाईन यांची प्रित जरा हटकेच आहे. व्हॅलेंटाईन नाव असलेले सहा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटलावर चमकून गेले आहेत.
                         यापैकी व्हिन्सेंट व्हॅलेंटाईन हे सन १९३३ मध्ये वेस्ट इंडिज कडून २ कसोटी खेळले. सन १९३० च्या दशकात ब्रायन व्हॅलेंटाईन इंग्लंडकडून ७ कसोटी खेळले. वेस्ट इंडिजचे आल्फ व्हॅलेंटाईन हे सर्वात यशस्वी व्हॅलेंटाईन ठरले. आल्फ व्हॅलेंटाईन या फिरकीपटूने विंडीजसाठी १३९ बळींची कमाई केली आहे. व्हॅलेंटाईन या वलयांकित नावात चौथा क्रमांक लागतो तो महिला क्रिकेटपटू कॅरोल व्हॅलेंटाईन हिचा. सन १९३४ - ३५ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यामध्ये खेळण्याचा ऐतिहासिक मान कॅरोल व्हॅलेंटाईन हिला मिळाला आहे. आल्फ व्हॅलेंटाईन हे या समुहातील सर्वात जास्त प्रसिध्द होते. आल्फ व्हॅलेंटाईन व व्हिन्सेंट व्हॅलेंटाईन हे दोघेही विंडीजच्या जमैका बेटावरचे. त्या दोघांत कुठलेही नाते संबंध नव्हते. केवळ नावांत साम्यता होती इतकेच.
                        सन १९७९ च्या विश्वचषक स्पर्धेत जॉन व्हॅलेंटाईन नावाचा खेळाडू कॅनडाकडून ३ सामने खेळला. व्हॅलेंटाईन लॉरेन्स नावाचा एक वेगवान गोलंदाजही इंग्लंडकडून खेळला. मॅथ्यू व्हॅलेंटाईन फ्लेमिंग हा खेळाडू इंग्लंडकडून अकरा एकदिवशीय सामने खेळला. या मॅथ्यूच्या वडिलांचे नांव व्हॅलेंटाईन होते. म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख करणेही अगत्याचे ठरले.
                        जरा नीट विचार केला तर व्हॅलेंटाईन नावाच्या खेळाडूंमुळे व्हॅलेंटाईन डे पाळला जात नाही. पण व्हॅलेंटाईन डे मुळे त्यांच्या व्हॅलेंटाईन या नावाचे स्मरण नक्कीच होते. पण खरंच व्हॅलेंटाईन हे एक ओढ लावणारे अतूट नाव आहे ! क्रिकेटमधील सर्व
व्हॅलेंटाईननी आपलं सारं प्रेम क्रिकेटवर भरभरून केले. त्यामुळे क्रिकेट, प्रेम व व्हॅलेंटाईन यांची दास्तान अजबच वाटते.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment