तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

बनावट कागदपत्रे तयार करून रस्त्यावरच प्लॉट दाखवून खरेदी-विक्रीचा केला व्यवहार परळी नगर पालिकेने चौकशी न करताच नांवनोंदणीची केली कारवाई,त्रया प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा-प्रा.पवन मुंडे


परळी वैजनाथ, दि.25 (प्रतिनिधी)ः-
शहरातील प्रभाग क्र.13 मधील पंचवटी नगर भागात बनावट कागदपत्रे तयार करून चक्क वाहतुकीच्या रस्त्यावरच भुखंड (प्लॉट) दाखवून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून विशेष म्हणजे या बोगस भुखंडाच्या नावनोंदणीची कोणतीही चौकशी न करता नगर पालिकेने कारवाई सुरू केल्याने पालिकेचा गलथानपणाही पुढे आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केली आहे.
या प्रकरणी प्रा.पवन मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले की, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रभाग क्र.13 मधील पंचवटीनगर भागातील पंचवटीनगर ते साईनगर या रस्त्यावर मालकीचा प्लॉट दाखवून त्याची सुमारे दोन लाख रूपयाला विक्री करण्याचा प्रकार गणपत भगवान कोरे (रा.स्नेहनगर) यांनी केला आहे. यासाठी तयार करण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट आहेत. हा प्लॉट 24 डिसेंबर 2019 ला जावेद खान पिता लतीफ खान पठाण (रा.पेठ मोहल्ला परळी) यांना विकला असून  त्यापोटी पन्नास हजार रूपये देवून ताब्यासह इसार पावती करण्यात आली आहे. यासाठी साक्षीदार म्हणून नवनाथ दगडोबा गुरव व बाळासाहेब नारायण मुंडे (रा.दादाहरी वडगाव) यांनी काम पाहिले आहे. विशेष म्हणजे हा प्लॉट परळी सहकारी हौसिंग सोसायटी स्नेहनगर परळी या संस्थेच्या मालकीचा दाखवला गेला आहे. यासाठी बनावट प्रमाणपत्रही इसार पावतीला जोडले आहे. हा प्लॉट स्नेहनगर हौसिंग सोसायटीचा नसल्याचा खुलासा संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी लेखी पत्राद्वारे केला आहे. पंचवटीनगर ते साईनगर हा रस्ता सर्व्हे नंबर 499 मध्ये आहे. तो वाहतुकीचा रस्ता आहे. याची नोंद सिटी सर्व्हे, नगरपालिका व इतर संबंधितांकडे आहे. असे असतानाही रस्त्यावरच मालकीचा प्लॉट दाखवून त्याची इसार पावती करणे हा अजब प्रकार गणपत कोरे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून केला असल्याचा आरोप प्रा.पवन मुंडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या प्लॉटची खरेदी करणारे जावेद खान पिता लतीफ खान पठाण यांनी प्लॉटच्या नांवनोंदणीसाठी परळी नगर पालिकेकडे 12 फेब्रुवारी 2020 ला इसार पावतीच्या छायांकित प्रती जोडून अर्ज दाखल केला आहे. पालिका प्रशासनाने कोणतीही शहानिशा न करता या प्लॉटच्या नांवनोंदणीसाठी जाहीरनामा स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धीला दिला आहे. इसार पावतीवर नावनोंदणी करण्याचा अजब प्रकार पालिकेने केला असून यासाठी मोठा आर्थिक व्यवहार पालिकेच्या संबंधित अधिकार्‍याने केला असावा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी प्रा.पवन मुंडे यांनी केली आहे. हा प्रकार पालिकेला दिशाभूल करणारा असेल तर पालिकेने संबंधित खरेदी-विक्री करणार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा  दाखल करावा अशी मागणी प्रा.मुंडे यांनी केली आहे.

परळी सहकारी हौसिंग सोसायटी स्नेहनगर या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी दिलेल्या लेखी खुलाशात 499 या सर्व्हेनंबर संस्थेची जागाच नाही असे स्पष्ट करून खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबाबत 21 मार्च 2018 ला संस्थेचा ठराव झाल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडले आहे. हे पूर्णपणे दिशाभूल करणारे व खोटे असल्याचे संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी लेखी खुलाशात स्पष्ट केले आहे.

- प्रा.पवन मुंडे 

No comments:

Post a Comment