तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

प्रतिकूलतेवर मात करत पूनम यादवची गगनभरारी


              ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांचा टि-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने संभाव्य विजेता व मातब्बर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला चकीत करून विजयश्री मिळवून आपली सुरुवात झोकात केली. या विजयाने भारताच्या विजेतेपदाला नवी दिशा मिळेल. या सामन्यात भारताच्या १३२ धावांचा प्रतिकार करताना कांगारू अगदी विजयाच्या समीप पोहचले होते. परंतु बिकट प्रसंगात संपूर्ण संघाने जी चिवटता दाखविली ती नक्कीच कौतुकास्पद अशीच होती. तरीपण या विजयात प्रमुख वाटा उचलला तो २८ वर्षीय लेगस्पीनर ( फिरकीपटू ) पूनम यादव हिने. तिने आपल्या कोटयातील चार षटकात मात्र १९ धावांचे मोल देत चार ऑस्ट्रेलियन फलंदाजांना डग आऊटमध्ये धाडलं. पूनमने तिच्या घातक गोलंदाजीने पट्टीच्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरशः नाचवले. याच पूनम यादव विषयी आपण या लेखात जाणून घेऊ या.
                  २४ ऑगष्ट १९९१ रोजी आग्रा येथे पूनमचा जन्म झाला. तिचे वडील भारतीय लष्कारात सेवेत होते. तर आई मुन्नी देवी गृहीणी आहे. वडिलांची कडवी शिस्त व आईच्या निगराणीखाली तिने क्रिकेटचे धडे गिरवले. २९ ऑगष्ट २०१९ रोजी राष्ट्रीय क्रिडा दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते तिला अर्जुन पुरस्कार मिळाला. अर्जुन अवॉर्ड मिळविणारी पूनम ५४ वी क्रिकेटपटू होय.
                    स्त्रिया सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. इतकेच नाही तर काही क्षेत्रात पुरुषांपेक्षा श्रेष्ठही आहेत. बऱ्याच ठिकाणी स्त्री पुरुष एकाच ठिकाणी एकत्र काम करतात. तसेच क्रिकेटमध्ये ही महिला व पुरुष खेळाडू एकत्र सराव करतात. परंतु कधी कधी यात अडचणी पैदा होतात. सुरुवातीच्या काळात अशा बऱ्याच अडचणींचा तिला सामना करावा लागला. सन २००९ मध्ये अशीच एक हरकत घडली. मुलांसोबत सराव करण्याच्या तक्रारीनंतर दोन ते तीन दिवस ती सरावाला गेली नाही. तिच्यातील क्रिकेटची उर्मी बघून तिच्या आईला कळून चुकलं होतं की, हि जास्त काळ घरात बसू शकणार नाही. त्यानंतर तिच्या भावाकडे तिला मैदानावर ने - आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
                  पूनम जेंव्हा मैदानावर तासंतास सराव करत असायची तेंव्हा तिचा भाऊ मैदानातच थांबून राहायचा. मधल्या काळात ती सरावाला जात नसे तेंव्हा घरातच गोलंदाजीचा सराव करायची. तिचे वडिल रघुवीरसिंग यांनी तर घरातील प्रत्येकाला सक्त ताकीद देऊन ठेवली होती की मुलीला खेळू द्या. पुढे जाऊ दया. मग पुनमही वडिलांच्या प्रेरणेने पेटून उठली व जोमाने कष्ट करायला लागली.
                    आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच पूनम प्रभावशाली ठरली होती. बांगलादेश विरूध्दच्या त्या सामन्यात तीन ४ षटकांच्या हप्त्यात २१ धावात ३ बळी घेतले. तसेच बांगलादेशविरुद्धच तिने ९ धावात ४ बळी घेऊन आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.
                     पूनमचा जन्म २४ ऑगष्ट १९९१चा. टि २० पदार्पण ५ एप्रिल २०१३ रोजी केले. तर वन डे पदार्पण १२ एप्रिल २०१३ रोजी केले. विशेष म्हणजे तिचे दोन्ही पदार्पण बांगलादेश विरूध्दच झाले.
                       पूनमची सध्या होत असलेली कामगिरी अशीच सुरू राहीली तर भारताला विजेतेपदाचे स्वप्न साकार करता येईल व सध्या पुरुष खेळाडूंचे वारेमाप लाड पुरविणाऱ्या बीसीसीआयलाही चपराक देता येईल.

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment