तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

संयमाने ज्ञानप्राप्ती होते - स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज कासारवाडीत प्रतिपादन : सजीव देखाव्यामुळे कथेस तरुणवर्गाचा प्रतिसाद
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-


दृष्टी व मन शुद्ध करा. मनाला ईश्वराचे स्मरण होण्यासाठी जपाशिवाय अन्य साधन नाही. कर्म हे चित्तशुद्धी साठी आहे तर भक्ती ही मनाच्या एकाग्रतेसाठी असते. चित्त शुद्ध झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा जाणवते. ज्याचे मन निर्मळ असेल, दृष्टी शुद्ध असेल, जो निस्वार्थ मनाने कर्म करत असेल त्याच्यासाठी जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सृष्टीत वावरताना प्रत्येक जिवाला सुखी करणे हाच मानवाचा धर्म आहे. हाच आदर्श वराभ भगवंतांनी आपल्या आचरणातून मानवाला शिकवला आहे. मन वचन व शरीराने कोणालाही त्रास न देणे हाच खरा यज्ञ आहे तर मानवाला सुखी ठेवले हा खरा धर्म आहे असे विचार संत साहित्यिक तथा प्रसिद्ध कथाकार स्वामी डॉ.तुळशीरामजी गुट्टे महाराज यांनी तालुक्यातील कासारवाडी येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या द्वितीय व तृतीय पुष्पात बोलताना मांडले.
जीवनात ज्ञानाची प्राप्ती करणे ही गोष्ट कठीण नाही. ज्ञानप्राप्ती तर प्रत्येकाला होते पण प्राप्त झालेले ज्ञान स्थिर राहत नाही. मानवी शरीर ही एक नगरी असून त्याला नऊ छिद्रे आहेत. कित्येक वेळा विचार वासनांच्या ओघात ते ज्ञान वाहून जाते. तसं पाहिलं तर प्रत्येक आत्मा हा ज्ञानमयी आहे. म्हणून अज्ञानी कोणीच नाही. प्राप्त केलेले ज्ञान सतत टिकून ठेवण्यासाठी इंद्रियांच्या द्वारे वाहून जाणाऱ्या बुद्धी शक्तीला रोखून ठेवणे गरजेचे आहे. बौद्धिकशक्तीला रोखून ठेवण्यासाठी पंचेंद्रिय तसेच मनावर नियंत्रण ठेवावे लागते. बुद्धि निष्काम झाल्यावरच बुद्धिविद्या नष्ट होऊ शकते.
जीवनाला सात्विक बनवा. शरीरातील सात्विक गुणांच्या वृत्तीने ज्ञानाची प्राप्ती होते. संयम सदाचार आणि शुद्ध आचार, विचार व आचरणानेच सत्त्वगुणाची वृद्धी होती. जसजशी सत्त्वगुणाची वृद्धी होईल तसतशी ज्ञानाचीही वृद्धी होते.पूर्ण संयमाशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही अन् ज्ञानाचीही प्राप्ती होत नाही.
 ज्या वेळी माणूस धर्माला धनापेक्षा जास्त किंमत देतो तेव्हा त्याचे जीवनमान सुधारू लागते. जेंव्हा मातेचा दोष असेल तेंव्हा विलासी पुत्र जन्माला येतो, जेव्हा बापाचा दोष असेल तेव्हा मूर्ख पुत्र जन्माला येतो, जेव्हा वंशाचा दोष असेल असेल तेव्हा भित्रा पुत्र जन्माला येतो तर जेव्हा त्याचा स्वतःचा असेल तेव्हा दरिद्री पुत्र जन्माला येतो. ज्यावेळी मानवात स्वार्थी वृत्ती जाणवते, ज्यावेळी बुद्धीला स्वार्थाची चाहूल लागते तेव्हा तो दुसऱ्यांचा नाश करण्यास सिद्ध होतो. दुसऱ्यांचा नाश केला किंवा एखाद्या बद्दल मनात कुभाव बाळगला तर समोरच्याच्या मनात ही आपल्या बद्दल कुभावाची भावना निर्माण होते. यामुळेच एकमेकातील शत्रुत्वाला वाचा फुटते विनाकारण शत्रूंची निर्मिती होते. माणसाचे शत्रू हे समाजात नसून स्वतःच्या आत आहेत. शत्रूंची निर्मिती ही कर्मावर अवलंबून असते. जेव्हा कर्म चांगले कराल मनातील शत्रूंना माराल तेव्हा या विश्वात तुमचा कुणीही शत्रू राहणार नाही असे वैचारिक चिंतन स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी यावेळी कथेतून बोलताना केले. विविध वैज्ञानिक व आध्यात्मिक दाखले देत त्यांनी समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट रुढी-परंपरा इ. वर घाव घातला.प्रसंगी कथेला श्रीहरी गवते, आदिनाथ दरेकर, व राधाकृष्ण खामकर यांनी गायन, वंदन व संगीतातून साथ दिली.
यावेळी कथा श्रावण व आरतीसाठी जि.प सदस्या रेखा अघाव, प्रा.मधुकर अघाव, सरपंच वसंत अघाव, नीलकंठ दराडे,आयोजक अच्यूत गुट्टे, राजेश गुट्टे , गोसावी महाराज यांच्या सह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment