तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

बांगलादेशी खेळाडूंचं वागणं क्रिकेटला गालबोट लावतंय


         सन २०२० चा १९ मुलांचा वर्षाखालील विश्वचषक भले बांगलादेशने जिंकून त्यांच्या देशाला क्रिकेटच्या नकाशावर चमकवले, परंतु त्यांच्या त्याच उन्मादी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंशी गैरवर्तनाची परिसिमा पार करत स्वतःला खलनायक साबीत तर केलेच परंतु बांगलादेशींची भारताविरुद्धची कुत्सित मानसिकताही साबीत केली. बांगलादेशचा जन्मच मुळी भारताच्या सहकार्यातून झाला आहे. भारत त्यांना आजही सर्वच बाबीत सढळ हाताने मदत करत आहे. भारताच्या सर्वंकष मदतीवरच त्यांची क्रिकेटसह अनेक क्षेत्रात प्रगती सुरू आहे. तरीही हे बांगलादेशी खेळाडू खाल्ल्या मिठाला जागणे तर सोडाच छोटीशी नैतिकताही जपताना दिसत नाही. हे ताजं घडलेलं प्रकरणच नाही त्यांच्या मुख्य संघानेही
जोशात येत यापूर्वी भारताच्या प्रमुख खेळाडूंविषयी आक्षेपार्ह वर्तन केले आहे. याला त्यांच्या समर्थकांनी, त्यांच्या प्रसिद्धी माध्यमांनीही मोठे सहकार्य केले आहे. अशा निरर्थक गोष्टींमुळे या दोन देशांतील संबंधातही कटुता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
              ९ फेब्रुवारीच्या त्या अंतिम सामन्यात बांगलादेशी खेळाडूंची देहबोली अगदी सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंना बिथरवण्याची होती. अगदी याच रणनितीने त्यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांना लाजवेल अशी स्लेजिंग (शेरेबाजी ) व खेळाडूंना जखमी करण्याची संधी सोडली नाही. हे आपण प्रत्यक्ष सामना बघताना मैदानात किंवा दूरचित्रवाणीवर अनुभवलंच आहे. बांगलादेशी खेळाडूंच्या चुकीच्या वागण्याबद्दल आयसीसी सख्त कारवाई करेलच परंतु सदर घटना सभ्यगृहस्थाचा खेळ गणला जाणाऱ्या क्रिकेटला काळीमा फासणारी अशीच आहे. बांगलादेशी खेळाडूंनी अतिउत्साहात केलेल्या गैरवर्तनाची अनेक उदाहरणे क्रिकेट मैदानात घडलेली आहे. त्यातील काही बोलके प्रसंग आपल्या माहिती घेऊन येत आहोत.
                  या अंतिम सामन्यापूर्वी एक दिवस अगोदरचीच गोष्ट, सध्या बांगलादेशचा मुख्य संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. तेथे रावळपिंडी कसोटीत चिवट खेळ करणाऱ्या पाकच्या अझर अलीला खिजवून बाद करण्यासाठी बांगलादेशी वेगवान गोलंदाज अबु जायेदने गलिच्छ शब्दांचा भडीमार केला. अखेर याची दखल आयसीसीनेही घेवून जायेदचा एक मानांकन गुण कमी केला.
                सन २०१८ मध्ये श्रीलंकेत निधास ट्रॉफी झाली. त्यास्पर्धेत एका महत्वाच्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरीत गाठली. त्या विजयानंतर संपूर्ण बांगलादेशी खेळाडूंनी हिडीस असा नागीण डान्स केला. प्रेमदासा स्टेडीयमधील ड्रेसिंग रूमचा दरवाजाही तोडला. ळचा संघनायक साकीब अल हसन अधिकाऱ्यांशीही भांडला, त्यामुळे चालू सामन्यात व्यत्यय आला होता. इतकेच नाही तर बाहेर बसलेल्या राखीव बांगलादेशी खेळाडूंनी असभ्यपणाचा कळस गाठला होता. जानेवारी २०१८ मध्ये याच बांगलादेशच्या शब्बीर रहमानने देशांतर्गत स्पर्धेदरम्यान एका प्रेक्षकाला बदडलं होतं, त्यामुळे बांगलादेशी क्रिकेट मंडळाने त्याच्याशी असलेला करार संपुष्टात आणला होता.
                     सन २०१६ च्या टि २० विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत विंडीजने भारतावर विजय मिळविल्यानंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशाफिकूर रहीमने भारत हरल्याबद्दल आनंद झाल्याचे ट्वीट केले होते.
                     सन २०१६ च्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान बांगलादेशचा वेगवान गोलंदाज टस्कीन अहमद तत्कालिन कर्णधार महेंद्रसिंग धोनीचेे तोडलेलं मुंडकं हातात धरून उभे असल्याचे एक पोस्टर बांगलादेशी समर्थकाने बनवलं व प्रसिद्धी माध्यमांनी सगळीकडे प्रसारित करून आगीत तेल ओतण्याचे काम केले. ही अतिशय निंदनीय घटना होती.
                  भारतीय खेळाडूंचा तिरस्कार करण्यात बांगलादेशी प्रसिद्धी माध्यमेही मागे नाहीत. सन २०१५ च्या बांगलादेश दौऱ्यात भारतीय फलंदाज मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर खेळताना गडबडत होते तेव्हा तेथील एका वृत्तपत्राने भारताच्या प्रमुख फलंदाजांची अर्धी चंपी केलेले फोटो प्रसिद्ध केले व खाली लिहीले होते की हा मुस्तफिजूरच्या कटरचा परिणाम आहे.
                    सन २०१४ च्या सत्रात श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तत्कालीन बांगलादेशी कर्णधार साकिब अल हसन बाद होऊन परतत असताना अश्लीलपणे स्वत:च्या कमरे खालच्या भागाकडे व नंतर कॅमेऱ्याकडे गलिच्छ हावभाव करत तंबूत गेला. या बद्दल त्याच्यावर ३ वनडे सामन्यांची बंदी व तीन लाख बांगलादेशी टका दंड करण्यात आले आहे.
                  याच प्रकारची मस्ती असीच राहिली तर बांगलादेशच्या क्रिकेटला फार मोठे नुकसान सोसावे लागू शकते. हि बांगलादेश क्रिकेटसाठी चांगली गोष्ट नसेल. कारण शेरास शेर कधीतरी भेटतच असतो.

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment