तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय


कांस ( फ्रान्स)  महोत्सवासाठी  चित्रपट निवडण्यासाठी

समिती नियुक्त करण्यात येणार 

-- ना. अमित विलासराव देशमुख

 मुंबई, दि.12:

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्या वर्षीचे उत्कृष्ट मराठी चित्रपट पाठविण्यात येतात. मे महिन्यात होणाऱ्या कांस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी चित्रपट निवडण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव  देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री ना. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची 153 वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.

ना. श्री. देशमुख म्हणाले की, मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मे 2020 मध्ये कांस ( फ्रान्स ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  उत्कृष्ट मराठी चित्रपट पाठविण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सिनेमांची निवड करण्यासाठी निवड समिती लवकरच नियुक्त करण्यात येणार आहे. निवड झालेल्या चित्रपटांच्या दोन प्रतिनिधींचा सर्व खर्च, जाहिराती महामंडळाकडून करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाकडे इच्छुक निर्मात्यांनी याबाबत प्रवेशिका सादर कराव्यात असे आवाहनही यावेळी सांस्कृतिक मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केले. 

बैठकीदरम्यान श्री. देशमुख यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच महामंडळाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन द्वारे नियमित सर्वेक्षण, अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करणे याबाबतही आढावा घेतला.

No comments:

Post a Comment