तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १६ जागांची वाढ ; वैद्यकीय शिक्षण व रूग्णसेवेचा दर्जा उंचावणारअंबाजोगाई (प्रतिनिधी) :-  भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांची पुर्तता केल्यामुळे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, शरीरविकृती शास्त्र आणि औषध व रोगप्रतिबंधक विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १६ जागा वाढविण्यास मान्यता मिळाली आहे. वाढलेल्या जागांमुळे स्वाराती मधील वैद्यकीय शिक्षणाचा व रूग्णसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.

स्वाराती महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कायम ओढा असतो. रुग्णांचे प्रमाण प्रचंड असल्याने विविध प्रकारच्या रोगांचा आणि रुग्णांचा अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळते. स्वाराती रुग्णालयाची गरज विद्यार्थ्यांचा कल पाहता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढणे आवश्यक झाले होते. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या कठोर मानकांची पूर्तता केल्यानंतरच या जागा वाढविण्यात येणार असल्याने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि सर्व विभागप्रमुखांनी परिश्रमपूर्वक सर्व विभाग सुस्थितीत आणले आणि वाढीव जागांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मानकांची पूर्तता केली. त्यानंतर सलग तीन वेळेस कडक तपासणी केल्यानंतर भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ‘१०-अ’ अंतर्गत स्वाराती महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागासाठी ५, शरीरविकृती शास्त्र विभागासाठी ५ आणि औषध व रोगप्रतिबंधक विभागात ६  असे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण १६ जागा वाढविण्यास मान्यता दिली आहे. वाढलेल्या जागांमुळे स्वाराती मधील वैद्यकीय शिक्षणाचा व रूग्णसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. प्रयत्नपूर्वक मिळविलेल्या या यशाबद्दल अधिष्ठाता व संबंधित विभागाचे विभागप्रमुख यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

▪ अशी आहे वाढ :

सुक्ष्म जीवशास्त्र विभागासाठी  यापूर्वी ३ जागा होत्या, त्या आता ८ करण्यात आल्या आहेत. औषध व रोग प्रतिबंधक विभागातील २ जागांची संख्या आता वाढून ८ झाली आहे. तर, शरीर विकृतीशास्त्र विभागातील यापूर्वीच्या ४ जागामध्ये वाढ होऊन आता ९ जागा उपलब्ध झाल्या आहेत.

▪ आणखी १४ जागा वाढण्याची शक्यता :

सर्व विभागप्रमुख, डॉक्टर्स, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच जागा वाढविण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. नजीकच्या काळात लवकरच इडब्ल्यूएस अंतर्गत शल्य चिकित्साशास्त्र विभागाच्या ५, औषध वैद्यकशास्त्रच्या ५, स्त्रीरोग विभागात २ आणि भूलशास्त्र विभागात २ पदव्युत्तर जागा वाढण्याची शक्यता आहे.”
- डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता

No comments:

Post a Comment