तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

संगीत, नृत्य आणि कला विद्यापीठ' सुरु करण्याबाबत शासन पुढाकार घेणार - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई,  : महाराष्ट्रात अनेक शास्त्रीय संगीत, नृत्य आणि कला घराणी आहेत. या घराण्यांतून अनेक दिग्गज कलाकार महाराष्ट्राला मिळाले. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अधिकाधिक कलाकार घडावेत यासाठी महाराष्ट्रात 'संगीत, नृत्य आणि कला विद्यापीठ' सुरु करण्याबाबत शासन पुढाकार घेईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संगितले.

सांस्कृतिक संचालनालयातर्फे दरवर्षी देण्यात येणारा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यंदाचा पुरस्कार पंडित अरविंद परिख यांना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री.देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, मानपत्र तसेच मानचिन्ह असे आहे.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, यांच्यासह गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळविणारे पंडित केशव गिंडे, पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव समितीचे  सदानंद नायमपल्ली, उस्मान खाँ, यावेळी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी समजायला कठिण असलेले शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले, तर पंडित अरविंद परिख यांनी सतारीला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून बहुमान मिळवून दिला. आज त्यांना गौरविण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे. नजिकच्या काळात शास्त्रीय संगीत व संगीत नाटकांची उच्च परंपरा कशी पुढे नेता येईल, याचा कृती आराखडा बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

यासाठी काही सूचना असल्यास सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मला कळवावे. येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्य विभागाने अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचे नियोजन करावे.

ज्येष्ठ सतार वादक पंडित अरविंद परिख यांना प्रदान करण्यात येणारा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आहे, महाराष्ट्रातील अनेक कलाकार याना पाठिंबा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. या कलाकारांसाठी पेन्शन योजना सुरु करण्याबाबत श्री.परिख यांनी दिलेल्या सूचनेचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून स्वीकार करीत असल्याचे श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.

जीवनगौरव पुरस्कार विजेते पंडित अरविंद परिख मनोगतात म्हणाले की,  आज  असे  अनेक कलाकार आहेत की ज्यांना शासनाने पाठिंबा देणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती हा आपला अनमोल ठेवा आहे. तर शास्त्रीय संगीत ही आपली शक्ति आहे. शास्त्रीय गायक-वादक कलाकारांसाठी शासनाने मदत करावी. शास्त्रीय संगीतातील ज्यांना गुरू मानले जाते त्यांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. अशी भावना श्री.परिख यांनी व्यक्त केली.
पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी श्री.उस्मान खाँ, श्री.सदानंद नायमपल्ली, श्री.श्याम गुंडावार, श्रीमती भारती वैंशपायन, श्री.बाळ पुरोहित, शुभदा पराडकर या मान्यवरांच्या समितीने ज्येष्ठ सतारवादक पं.अरविंद परिख यांची शिफारस केली होती.
यापूर्वी हा पुरस्कार श्रीमती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना, श्रीमती माणिक भिडे, पं.केशव गिंडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment