तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचे सुत्रधार


       न्यूझीलंड दौऱ्यावर टि-२० मालिकेत अनपेक्षितरित्या ५-० अशी लॉटरी लागलेल्या भारतीय संघाला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत संभाव्य विजेताच नाही तर संपूर्ण दौऱ्यावर क्लिन स्वीपचा हक्कदार गणले जात होते. परंतु हॅमिल्टनच्या त्या धावांनी भरलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या निष्प्रभ गोलंदाजी व कर्णधाराच्या नियोजन शुन्य नेतृत्वामुळे संघाला शंभर टक्के मिळणाऱ्या विजयाचे सहज भेटलेल्या पराभवात रूपांतर झाले.एरव्ही जगातील सर्वात प्रबळ व प्रभावी गोलंदाजीचा ताफा गणला जाणारा भारतीय गोलंदाजांचा चमू त्या सामन्यात शाळकरी गोलंदाजांसारखा वाटला.
                  या प्रस्तुत सामन्यात विल्यम्सनच्या गैरहजेरीत नेतृत्व करत असलेल्या टॉम लॅथमने आघाडीवर राहात संघाला मजबूत भारतावर विजय मिळवून दिला. तत्पूर्वी भारतीय फलंदाजांनीही ३४७ धावांचे रतीब ओतून विजयाची पायााभरणी केली खरी परंतु वरातीच्या घोडयासारखे उधळलेेल्या गोलंदाजांनी वाईड चेंडूचीं अक्षरशः खिरापत वाटली. २४ वाईड म्हणजे चार षटके अवांतर टाकून सामना थेट न्यूझिलंडला दानच करून टाकला. या ऐतिहासीक पराभवाला कारण ठरलेल्या या खलनायक खेळाडूंच्या कामगिरीवर एक प्रकाशझोत टाकूया.
                 या पराभवातला सर्वात मोठा खलनायक ठरला कर्णधार विराट कोहली. वैयक्तीकरित्या त्याने फलंदाजी चांगली कामगिरी केली. परंतु एक कर्णधार म्हणून तो साफ फिका पडला. अष्टपैलू म्हणून संघात घेतलेल्या केदार जाधवला तर त्याने बिकट परिस्थितीतही गोलंदाजी दिली नाही. इतकेच नाही तर प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराहची गोलंदाजी संपविण्याची फार घाई केली व महागडा ठरत असलेल्या शार्दूल ठाकूरला षटकामागून षटके देत बसला. तर हुकमी एक्का ठरू शकणाऱ्या नवदिप सैनीला संघातच घेतले नाही. षटकांची गती राखण्यात कमी पडल्यामुळे संपूर्ण संघालाच दंडाला सामोरे जावे लागले. ही एक कर्णधार म्हणून कोहलीची खराब कामगिरीच म्हणावी लागेल.
              न्यूझिलंड दौऱ्यात आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या कुलदीप यादवने दोन बळी घेतले खरे परंतु त्यासाठी ८४ धावांचे मोल मोजून संघाच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांचा अक्षरशः चक्काचूर केलाच शिवाय वनडेत सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज बनला.
              टि-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय विजयाचा नायक ठरलेला शार्दूल ठाकूर या सामन्यात भलताच महागडा ठरला. केवळ एक बळी मिळवताना त्याने ८.३ षटकात ७५ धावांची उधळण केली. यामुळे भारताचे कार्य आणखी अवघड बनले.
              संघासाठी नेहमी जीव ओतून मारा करणारा मोहम्मद शमी या सामन्यात कमालीचा निस्तेज वाटला. ९ षटकात ६२ धावांच्या बदल्यात केवळ एकच बळी मिळाला. शिवाय त्याने स्वैर मारा करताना ६ वाईड चेंडू टाकून संघासाठी खाईच खोदली.
             प्रत्येक सामन्यात आपल्या अष्टपैलू खेळाने संघाला सदृढता देणारा रवींद्र जडेजा यावेळी ना गोलंदाजीत चमकला ना क्षेत्ररक्षणात संघासाठी लाभदायक ठरला. दहा षटकांच्या आपल्या निर्धारीत हप्त्यात त्याने ६४ धावा दिल्या मात्र एकही बळी घेण्यात अपयशी ठरल्याने संघाच्या अडचणीत भरच पडली.
               तर भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रित बुमराह सुध्दा निष्प्रभ ठरला. त्यानेही ९ वाईड चेंडू टाकून सर्वांनाच निराश केले. या खेळाडूंच्या अपयशामुळे भारत पराभूत झाले हे मात्र निश्चित.

लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment