तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

अस्सल मराठमोळा रांगडा कलावंत अवधूत गुप्ते यांचा परळीत प्रथमच लाईव्ह कॉन्सर्ट संपन्न! ; आज मानसी नाईक येणार परळीत
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद परळी वैजनाथ द्वारा आयोजित महाशिवरात्री महोत्सवात काल (दि.२४) सुप्रसिद्ध  संगीतकार,गायक आणी चित्रपट निर्माते महाराष्ट्राचा आवाज अवधूत गुप्ते यांचा 'सुर नवा ध्यास नवा'  हा कार्यक्रम अमर मैदान येथे संपन्न झाला. प्रचंड उर्जा आणि उत्साह असणारा कार्यक्रम होता. 

आपल्या मोरया, झेंडा, एकतारा आदी चित्रपटातील गाजलेली गीते त्याच बरोबर, ऐका दाजीबा, गर्जा महाराष्ट्र माझा या गाजलेल्या अल्बम मधील अनेक गाणी सादर केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भागवत यांनी या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये निवेदिका म्हणून अतिशय लक्षवेधी निवेदन करत अवधूत गुप्ते यांना सतत बोलते केले. जीवनातील अनेक चढउतार आणि सिलिब्रिटी देखील वेदना आणि संवेदना बाळगून असतो हे कळाले.

शेतकरी आत्महत्या बद्दल ची 'पत्रास कारण की' ही रचना सादर केल्यानंतर हजारो प्रेक्षकांचे डोळे पाणावले. तीन तास चाललेल्या या कार्यक्रमास परळीतील रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. परळीशी जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या अवधूत गुप्ते यांनी वैद्यनाथ गणेशोत्सव मध्येही येण्याचे घोषित केले आहे. खुपते तिथे गुप्ते, झी मराठी सा रे गा मा, सुर नवा ध्यास नवा तसेच अनेक रियालिटी शो मधून महाराष्ट्रातील घराघरात पोहोंचलेल्या अस्सल मराठमोळ्या कलावंतास पहाण्यासाठी आणि ऐकण्यासाठी अमर मैदानावर तोबा गर्दी झाली होती. या कार्यक्रमात मराठवाड्याची शान म्हणून ओळख असणारे मुन्नवर, तसेच मुग्धा कऱ्हाडे यांनी गायिलेली गितेही विशेष आकर्षण ठरले. यावेळी अवधूत गुप्ते यांच्या संचात 'चला हवा येऊ द्या' या प्रसिद्ध कार्यक्रमातील सर्व संगीतकार उपस्थित होते.

आज मानसी नाईक परळीत...

दरम्यान महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज (दि. २५) संध्याकाळी ७ वा. सिनेअभिनेत्री मानसी नाईक परळीकरांच्या भेटीस येत असून, चैत्राली राजे प्रस्तुत भन्नाट लावण्यांचा 'नाद करायचा नाय' हा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून परळीतील रसिक प्रेक्षकांनी आनंद घ्यावा असे आवाहन परळी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment