तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

दबा धरून शिकार करणारा ऑस्ट्रेलियन शेर - नाथन लायन


                ऑस्ट्रेलियाचा तत्कालिन कर्णधार मायकेल क्लार्कची खोज असलेला एक ग्राऊंडमन म्हणून काम करता करता थेट विरोधी फलंदाजांचा भक्षक बनलेला शेर दुसरा तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा आजच्या घडीचा अव्वल फिरकीपटू नाथन लायन हा आहे.
              नाथन मायकल लायन २० नोव्हेंबर १९८७ रोजी न्यू साऊथ वेल्स येथे जन्मला. उजव्या हाताने कामचलाऊ फलंदाजी करणारा नाथन उजव्याच हाताने ऑफब्रेक मारा करतो. तो गोलंदाजीला            ( स्टार्ट घेतो ) सुरूवात करतो तेंव्हा सर्वसाधारण वाटतो. परंतु प्रत्यक्षात चेंडू फेकताना तो नरभक्षक शेर बनतो. भल्याभल्या फलंदाजांना लालच दाखवून सावज आपल्या जाळ्यात खेचतो. त्याची सहज व साधी शैली किरकोळ भासते, परंतु डावाच्या शेवटी आकडेवारी त्याला वेगळेपण देऊन जाते. ३१ ऑगष्ट ते ३ सप्टेंबर २०११ रोजी गाले येथे श्रीलंकेविरूद्ध कसोटीचा श्रीगणेशा केल्यानंतर आजतागायत ९६ कसोट्यात त्याने कांगारूंचं प्रतिनिधीत्व केले असून १२३ डावात फलंदाजी करताना ३९ वेळा नाबाद राहात १२.२७ च्या सरासरीने १०३१ धावा जमविल्या आहेत. त्यामध्ये ४७ धावा  ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर गोलंदाजी या त्याच्या मुख्य प्रांतात १८४ डावात ३९० फलंदाजांची शिकार करताना ३१.५८ च्या सरासरीने बळी घेतले. कसोटीच्या एका डावात ५ किंवा अधिक बळी १८ वेळा तर १० किंवा त्याहून अधिक बळी ३ कसोटयात त्याच्या हाती लागले. डावात ५० धावात ८ तर कसोटीत १५४ धावांत १३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या दरम्यान ४८ फलंदाज त्याच्या हाती चेंडू टोलवून तंबूत विसावले.
                    कसोटीच्या तुलनेत पांढऱ्या चेंडूंच्या खेळात त्याला बेताचीच संधी मिळाली. तेथील आकडेवारी थोडक्यात बघूया.नाथन लायनने खेळलेल्या २९ वनडेच्या १४ डावात १० वेळा नाबाद राहात १९.२५ च्या सरासरीने ७७ धावा जमा केल्या आहेत. तर गोलंदाजीत २९ बळी त्याच्या वाट्याला आले. ४६.०० ची जराशी महागडी सरासरी राखताना इकॉनॉमी रेट ४.९२ अशी आहे. ४४ धावात ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या प्रकारात ७ फलंदाजांचे झेलही त्याच्या हाती लागले.
                  कसोटी व वनडेच्या तुलनेत टि-२० मध्ये अगदी किरकोळ संधी त्याला मिळाली. २ सामन्यातल्या केवळ एका डावात फलंदाजी करताना बाद न होता त्याने ४ धावा काढल्या.२ बळी घेतले. ३३ धावात एक बळी ही त्याची या प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी होय.
                   ८ मार्च २०१२ रोजी सिडनी येथे एकदिवशीय सामन्यात पदार्पण केले, तर २९ जानेवारी २०१६ रोजी मेलबोर्न येथे भारताविरूध्द पहिला टि-२० सामना खेळला.
                  शेन वॉर्नच्या निवृत्ती नंतर ऑस्ट्रेलियन फिरकी माऱ्याची धुरा नाथन लायनने समर्थपणे सांभाळताना कांगारूंना अनेक अविस्मरणीय विजयही मिळवून दिले आहेत. विरोधी संघाची फलंदाजी कशीही असो त्याने त्याचे काम ईमाने इतबारे पार पाडले आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाने मायभूमीत न्यूझिलंडचा कसोटीत ३-० असा फडशा पाडला. या कामगिरीत नाथन लायनने २० बळी घेऊन आपली भूमिका चोख बजावली. या ३३ वर्षीय गोलंदाजाचे अजून बरेच क्रिकेट शिल्लक असल्याने त्याच्या बळींचा आकडा आणखी फुगू शकतो.नाथन लायनच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment