तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

शेफाली वर्मा महिला क्रिकेटचा आलेख उंचावतेय


           सध्या ऑस्ट्रेलियात महिलांची टि-२० विश्वचषक स्पर्धा सुरू असून भारताने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून विश्वकरंडक पटकविण्याकडे वाटचाल सुरू आहे. यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत आस्मान दाखविताना भारतीय गोलंदाजांनी अफलातून मारा केला तर दुसऱ्या सामन्यात सध्या जागतिक पटलावर आपली छाप सोडू पहाणाऱ्या बांगलादेशलाही त्यांची जागा दाखवून दिली. या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकल्या नाहीत. परंतु गोलंदाजांनी, फलंदाजांनी रचलेल्या त्या धावांचे यशस्वी रक्षण केले. परंतु फलंदाजांच्या कमी धावांतही चमकदार खेळी करणारी एक षोडषवर्षीय कन्या सर्वांच्या नजरेत भरली.
                   २८ जानेवारी २००४ रोजी हरियाणातील रोहटक शहरात जन्मलेली शेफाली वर्मा उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करते. २४ सप्टेंबर २०१९ रोजी दक्षिण आफ्रिके विरूद्ध तिने टि-२० सामन्यात खेळून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला.
             १६ वर्ष २७ दिवस वयाच्या शेफालीने या चालू विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध खेळताना अवघ्या १७ चेंडूत ४ घणाघाती षटकार व २ खणखणीत चौकारांसह ३९ धावांची नेत्रदिपक खेळी साकारली. या खेळीच्या बळावर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १२५ धावात गुंडाळून १८ धावांनी विजय मिळाला. सामनावीर पुरस्कार अर्थातच शेफालीला मिळाला. येथेही ती विश्वविक्रम करून गेली. इतक्या कमी वयात सामनावीर पुरस्कार मिळविणारी ती पहीली महिला खेळाडू ठरली.
             वयाच्या १५ वर्ष व २८५ व्या दिवशी शेफालीने विंडीजविरुद्ध ४९ चेंडूत ७३ धावांची वादळी खेळी केली. त्या एका खेळीने तिने साक्षात क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरचा ३० वर्ष जुना विक्रम मोडला. सर्वात कमी वयात अर्धशतक झळकविण्याचा हा विक्रम सचिनने १६ वर्ष २१४ दिवसांचा असताना केला होता. तोही आता या सलामीला खेळणाऱ्या शेफालीच्या नावे लागला आहे.
           शेफालीचे वडिल संजीव वर्मा व्यवसायाने सुवर्णकार असून रोहटक मधील रेल्वे रोड लगतच्या सोनारगल्लीत ते व्यवसाय करतात. तिच्या
वडिलांना आपले मुले शेफाली व साहिल क्रिकेटपटू बनावे असे वाटायचे. परंतु मुलगी असल्याने शेफालीला कोणतीही क्रिकेट अकाडमी प्रवेश देत नव्हती. कारण सगळीकडे मुलांचेच प्रशिक्षण वर्ग चालायचे. मग तिच्या वडिलांनी छोट्या शेफालीचे मुलांसारखे केस कापून तिला मुलगा म्हणून क्रिकेट अकाडमीत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर तिच्या क्रिकेट जीवनाला वेगळे वळण मिळाले.
                  शेफाली अकरा वर्षाची असताना तिचा भाऊ साहिल ज्या क्लबकडून खेळायचा त्यांच्या एका स्पर्धेत ती साहिल म्हणून खेळली व प्रत्येक सामन्यात सामनावीर ठरली. तिच्या या खेळाच्या बळावर तिच्या संघाने विजेतेपदही मिळविले शिवाय मालिकाविराचा किताब ही शेफालीनेच पटकावला.
                 मुलांमध्ये सतत खेळत असल्याने शेजारी, नातेवाईक त्यांची हेटाळणा करायचे. परंतु आज तेच लोक तीची स्तुती करायला मागे हटत नाही. आठ वर्षाच्या शेफालीने सचिन तेंडुलकरला रणजी सामना खेळताना पाहिले तेंव्हाच तिला सचिन सारखे क्रिकेटर बनायचे मनात बिंबले होते. सचिनच तिचाही आदर्श खेळाडू व देवस्थानी आहे.
                शेफालीचे भविष्य उज्वल असून दिवसेंदिवस अनुभव येईल तसा तिच्या खेळात निखार येईलच. पण तिच्या रूपात दुसरा सचिन भारतीयांना मिळेल याचाही आनंद तमाम क्रिकेट रसिकांना नक्कीच होईल.

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment