तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

तिसऱ्या वनडे सामन्यातील पराभवाचे वाली


न्युझिलंड दौऱ्यात भारतीय संघाने प्रथम टि २० मालिका एकतर्फी खिशात घातल्या नंतर तीन एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेत भारत आपल्या लौकीकाला अजिबात जागले नाही. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारत कमीत कमी तिसरा सामना जिंकून गेलेली इभ्रत वाचवेल अशी अपेक्षा होती. परंतु तिसरा सामनाही गमावून भारताने १९८९ नंतर प्रथमच मालिकेतले सर्वच्या सर्व सामने गमावण्याचा नामुष्कीजन्य प्रसंग ओढवून घेतला. या सामन्यात न्यूझिलंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस पाचारण केले. खराब सुरुवातीनंतर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली खरी परंतु गोलंदाजांच्या नाकर्तेपणामुळे भारताला सामना गमवावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताने टि २० मालिकेत मिळविलेल्या विजयावर पाणी पडताना उघड्या डोळ्यांनी बघितले. 
              शार्दूल ठाकूर हा  वेगवान गोलंदाज या मालिकेत अत्यंत वाईट पध्दतीने किवीज फलंदाजांनी झोडला. तीनही एकदिवशीय सामन्यात प्रभावहीन मारा करत शार्दूलने मोठा अपेक्षाभंग करून संघाला अडचणीत टाकले. ९.१ षटकात ८७ धावात त्याने अवघा एकच बळी मिळविला. या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने केल्या, त्या पेक्षा अधिक धावा शार्दूलच्या गोलंदाजीवर निघाल्या. शार्दूलच्या या निराशजनक कामगिरीमुळे भारताला मालिका गमवावी लागली असे म्हंटले तरी वावगे ठरू नये.
                 डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून गणला जात असलेला अव्वल जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहा दुखापतीतून सावरला नसल्याने संघाला त्याच्याकडून अपेक्षीत असलेली कामगिरी तो करू शकला नाही. त्यातच त्याला गेल्या चार सामन्यात एकही बळी मिळविता न आल्याने भारत पराभवाच्या खाईत गेला. बुमराहा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट प्रसंगातून सध्या जात आहे. हीच भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
                दुसऱ्या एकदिवशीय सामन्यातही भारत हरला होता, परंतु त्या सामन्यात बॅट व बॉलने लक्षवेधक कामगिरी करणारा नवदिप सैनी या सामन्यात सर्वच क्षेत्रात साफ अपयशी ठरल्याने भारताला निराशजनक पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात त्याने ८.५० च्या सरासरीने धावा दिल्या.
                भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला कर्णधार विराट कोहली सर्वच मोहीमेवर अपयशी ठरल्याने भारताच्या पदरी साफ निराशा पडली. तिन सामन्यात ५१, ९ व १५ अशा मात्र ७५ धावा त्याच्या बॅटने निघाल्या. कर्णधार म्हणून त्याची प्रत्येक चाल फेल गेली. हीच भारताच्या अपयशाची शोकांतिका ठरली.
               रोहीत शर्मा शेवटच्या टि-२० सामन्यात जखमी झाला व संघातून बाहेर पडला हा भारतासाठी मोठा धक्का होता. परंतु त्याच्या ऐवजी स्थान मिळालेला मयंक अग्रवाल साफ अपयशी ठरल्याने संघाला एकाही सामन्यात मोठी सुरुवात मिळाली नाही. शिवाय त्याचा सलामीचा साथीदार पृथ्वी शॉ हा देखील म्हणावा इतका यशस्वी न झाल्याने संघाच्या पायाभरणीलाच हादरा बसला.एकंदर गोलंदाजांचा प्रभावाहिन मारा व सपक क्षेत्ररक्षण हेही पराभवाचे प्रमुख कारणं ठरली.
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment