तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

परळीच्या शिक्षण क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तीमत्व हरवले - धनंजय मुंडेपरळी वैजनाथ दि.२७.... श्री. अशोकराव भातंब्रेकर (वय ७४) यांच्या दु:खद निधनाने परळीच्या शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तीमत्व हरवले आहे. त्यांच्या निधनाने आपल्याला धक्का बसला असून परळीच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रासह आमच्या मुंडे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे; अशा शब्दात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

परळीच्या शैक्षणिक क्षेत्रात अशोक भातंब्रेकर यांनी मोठे योगदान दिले आहे. बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील नोकरीच्या निमित्ताने अशोकराव परळीत स्थायीक झाले. स्व. प्रमोदजी महाजन यांचे मेहुणे व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे ते जवळचे नातेवाईक (साडूबंधू) असूनही त्यांनी आपल्या वागण्यातून मोठेपणा अथवा अधिकार कधी गाजवला नाही. साधी राहणी, शांत स्वभाव, संयमी वृत्ती यामुळे ते परळीकरांना जवळचे वाटायचे. 

परळीच्या जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेचे ते दीर्घकाळ मुख्याध्यापक होते. परळी पंचायत समितीची स्थापना झाली तेव्हा परळीत गटशिक्षण कार्यालय सुरू होण्यासाठी अशोक भातंब्रेकर यांनी पुढाकार घेतला. १९९८ साली परळीत झालेल्या ७१ व्या मराठी साहित्य संमेलनात अशोक भांतब्रेकर यांनी मोठे योगदान दिले होते. 

परळी, अंबाजोगाईकर इतर तालुक्यातील शिक्षकांची शिक्षण विभागातील अडीनडीची कामे त्यांनी केली. परळीच्या शिक्षण विभागातील अनेक कामे त्यांनी पार पाडली. श्री. भांतब्रेकर हे शिक्षक प्रिय व्यक्तिमत्व होते. शिक्षकांचे मार्गदर्शक होते. 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सुमारे 22 वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणीवर पदाधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले आहे. शैक्षणिक गुणवत्ता अभियानात मराठवाड्यात परळी तालुका दुसरा येण्याचा बहुमान त्यांच्या शिक्षणाधिकारी पदाच्या काळात परळीला मिळाला होता. 

अशोकराव भांतब्रेकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची देखल घेवून शासनाने त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल केला होता. त्यांच्या दुखःद निधनाने परळीच्या सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तीमत्व हरवले आहे. स्व. पंडित अण्णा मुंडे, स्व. प्रमोदजी महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या निधनानंतर श्री. अशोकराव काका यांच्या रूपाने असलेला वडीलकीचा आधार आमच्या कुटुंबाने गमावला; अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment