तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

धर्मसंस्थापनेसाठी श्रीकृष्णाचा जन्म : डॉ.गुट्टे महाराज भागवत कथेचा समारोप ; काल्याच्या कीर्तनात प्रतिपादन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
 जीवनात काल्याचे विशेष महत्त्व असून जीवनाच्या उत्थानासाठी काला महत्वपूर्ण आहे. काल्याच्या कीर्तनातून समतेची बीजतत्वे प्रकट होतात. व्यावहारिकदृष्ट्या काला म्हणजे दही-दूध-लोणी व खाद्यपदार्थ यांचे एकत्रित मिश्रण होय. हाच काला भगवान श्रीकृष्णांनी ब्रजमंडळात गाई चारत असताना कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता आपल्या सवंगड्याच्या शिदोऱ्या एकत्र करून केला. काला म्हणजे जीव आणि शिवतत्वांचे मिलन असल्याचे विचार युवा संत तथा संत साहित्याचे अभ्यासक स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी मांडले. कासारवाडी येथे शुक्रवार दि.७ पासून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा शुक्रवार दि.१३ रोजी काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. 
काल्याच्या कीर्तनातून मनुष्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. आत्मकल्याणसाठीच बळ मिळतं. समत्वाची जाणीव होऊन विश्वात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. समता, बंधुता, न्याय व स्वातंत्र्यात या चतु:सूत्रीचे मूळ तत्व कल्याच्या कीर्तनात पाहायला मिळतात.असे ते म्हणाले. पुढे बोलताना वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात अग्रेसर असून या संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एकवेळ पंथाचे काम थांबू शकते पण संप्रदायाला कधीही धक्का लागू शकत नाही. धर्मरक्षणासाठी विष्णूचे अवतार आहेत. श्रीकृष्णानी बालपणापासून लीला केल्यात. श्रीकृष्णाच्या लीला अप्रतिम असून त्यांचा अवतार हा धर्मरक्षणासाठी आहे. धर्मावरील ग्लानी झटकण्यासाठी परमेश्वराचा अवतार होतो. आतापर्यंत २४ आवतारांच्या कथा येतात. या सर्व आवतारांच्या उल्लेख श्रीमद्भागवतात आहे. असे मत त्यांनी यावेळी बोलताना मांडले.यावेळी कीर्तन श्रवण व काल्याच्या महाप्रसादासाठी माजी मंत्री पंडितराव दौंड, भरत सोडगीर, अच्युत गुट्टे, राज गुट्टे, बंडू गुट्टे यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment