तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

शेफाली वर्माने महिला क्रिकेटला संजिवनी दिली


           सध्या ऑस्ट्रेलियात महिलांची टि-२० विश्वचषक स्पर्धा सुरू असून भारताने आपले सुरुवातीचे तिनही सामने जिंकून विश्वकरंडक पटकविण्याकडे वाटचाल सुरू आहे. यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत आस्मान दाखविताना भारतीय गोलंदाजांनी अफलातून मारा केला तर दुसऱ्या सामन्यात सध्या जागतिक पटलावर आपली छाप सोडू पहाणाऱ्या बांगलादेशलाही त्यांची जागा दाखवून दिली. तर तिसऱ्या सामन्यात न्यूझिलंड संघाला अतितटीच्या लढतीत ४ धावांनी मात देत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या तिनही सामन्यात भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकल्या नाहीत. परंतु गोलंदाजांनी, फलंदाजांनी रचलेल्या त्या धावांचे यशस्वी रक्षण केले. परंतु फलंदाजांच्या कमी धावांतही चमकदार खेळी करणारी शेफाली वर्मा नावाची एक षोडषवर्षीय कन्या सर्वांच्या नजरेत भरली.
                   २८ जानेवारी २००४ रोजी हरियाणातील रोहटक शहरात जन्मलेली शेफाली वर्मा उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करते. २४ सप्टेंबर २०१९ रोजी दक्षिण आफ्रिके विरूद्ध तिने टि-२० सामन्यात खेळून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा केला.
             १६ वर्ष २७ दिवस वयाच्या शेफालीने या चालू विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध खेळताना अवघ्या १७ चेंडूत ४ घणाघाती षटकार व २ खणखणीत चौकारांसह ३९ धावांची नेत्रदिपक खेळी साकारली. या खेळीच्या बळावर भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १२५ धावात गुंडाळून १८ धावांनी विजय मिळाला. सामनावीर पुरस्कार अर्थातच शेफालीला मिळाला. येथेही ती विश्वविक्रम करून गेली. इतक्या कमी वयात सामनावीर पुरस्कार मिळविणारी ती पहीली महिला खेळाडू ठरली.
               न्यूझिलंडविरूध्दच्या सामन्यातही तीने आपली लय कायम राखत अवघ्या ३४ चेंडूत ३ षटकार व ४ चौकारांचा वर्षाव करत ४६ धावांची लयलूट केली. भारताने मिळविलेल्या ४ धावांच्या विजयात शेफालीची खेळी महत्वपूर्ण ठरली. या खेळीचे फळ सामनावीर पुरस्काराच्या रूपात तिला मिळाले. सलग दोन सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरणारी सर्वात कमी वयाची महिला बनण्याचा मानही शेफालीला मिळाला. शेफालीच्या या खेळाने महिला संघात संजिवनी आलीच पण न्यूझिलंडमध्ये विजयाची वाट हरवलेला भारतीय संघ शेवटचा कसोटी जिंकून दिमाखात मायदेशी परतू शकतो.
             वयाच्या १५ वर्ष व २८५ व्या दिवशी शेफालीने विंडीजविरुद्ध ४९ चेंडूत ७३ धावांची वादळी खेळी केली. त्या एका खेळीने तिने साक्षात क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरचा ३० वर्ष जुना विक्रम मोडला. सर्वात कमी वयात अर्धशतक झळकविण्याचा हा विक्रम सचिनने १६ वर्ष २१४ दिवसांचा असताना केला होता. तोही आता या सलामीला खेळणाऱ्या शेफालीच्या नावे लागला आहे.
           शेफालीचे वडिल संजीव वर्मा व्यवसायाने सुवर्णकार असून रोहटक मधील रेल्वे रोड लगतच्या सोनारगल्लीत ते व्यवसाय करतात. तिच्या
वडिलांना आपले मुले शेफाली व साहिल क्रिकेटपटू बनावे असे वाटायचे. परंतु मुलगी असल्याने शेफालीला कोणतीही क्रिकेट अकाडमी प्रवेश देत नव्हती. कारण सगळीकडे मुलांचेच प्रशिक्षण वर्ग चालायचे. मग तिच्या वडिलांनी छोट्या शेफालीचे मुलांसारखे केस कापून तिला मुलगा म्हणून क्रिकेट अकाडमीत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर तिच्या क्रिकेट जीवनाला वेगळे वळण मिळाले.
                  शेफाली अकरा वर्षाची असताना तिचा भाऊ साहिल ज्या क्लबकडून खेळायचा त्यांच्या एका स्पर्धेत ती साहिल म्हणून खेळली व प्रत्येक सामन्यात सामनावीर ठरली. तिच्या या खेळाच्या बळावर तिच्या संघाने विजेतेपदही मिळविले शिवाय मालिकाविराचा किताब ही शेफालीनेच पटकावला.
                 मुलांमध्ये सतत खेळत असल्याने शेजारी, नातेवाईक त्यांची हेटाळणा करायचे. परंतु आज तेच लोक तीची स्तुती करायला मागे हटत नाही. आठ वर्षाच्या शेफालीने सचिन तेंडुलकरला रणजी सामना खेळताना पाहिले तेंव्हाच तिला सचिन सारखे क्रिकेटर बनायचे मनात बिंबले होते. सचिनच तिचाही आदर्श खेळाडू व देवस्थानी आहे.
               शेफालीच्या सातत्यपूर्ण खेळाचा धडाका असाच सुरू राहिला तर भारताला आपले कित्येक दिवसापासून अधुरे राहिलेले विश्वविजयाचे स्वप्न सहज साध्य करता येईल. त्याचबरोबर शेफाली नावाची नवी स्टार भारतीय क्रिकेट क्षितीजावर चमकेल.
             
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment