तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

ईशांत शर्मा - भारताचा सर्वात यशस्वी तिसरा वेगवान गोलंदाज


               न्यूझिलंड दौऱ्यासाठी जेंव्हा भारताच्या कसोटी संघाची घोषणा झाली तेंव्हा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला तंदुरुस्ती अभावी संघात निवडूनही मुळ संघासोबत न्यूझिलंडला जाऊ दिले नव्हते. बंगलुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकाडमीत त्याची कठोर सत्वपरीक्षेसारखी तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. तिच्यामध्ये पास होताच त्याला तातडीने वेलिंग्टनचे तिकीट देण्यात आले. १५ फेबुवारीला झालेल्या चाचणी नंतर तो १७ फेब्रुवारीला न्यूझिलंडला पोहोचला. नुकताच दुखापतीतून बरा झाला, मोठा विमान प्रवास आणि त्यानंतर तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यास लागू शकणारा वेळ लक्षात घेता त्याला २१ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत संघात स्थान मिळविण्याविषयी संदिग्धता होती. परंतु सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात त्याने केलेल्या कामगिरीने संघ प्रबंधनाने त्याच्यावर विश्वास दाखविला. यापूर्वी तो सन २००९ व १४ मध्ये न्यूझिलंडविरुद्ध न्यूझिलंडमध्ये खेळला असल्याने त्याला तिथला अनुभव त्याच्या इतर सहकारी गोलंदाजांपेक्षा जास्त होता. प्रत्यक्षात ईशांत शर्माला सामन्यात आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करता येईल का या विषयी सर्वांच्या मनात शंका होती, परंतु त्याने सर्व टिकाकार व हितचिंतकांना आश्चर्याचा धक्का देत न्यूझिलंडच्या पहिल्या डावात ५ बळी घेऊन आपली जबाबदारी चोख बजावली. या बरोबरच अनेक विकम त्याने बासनात गुंडाळले तर काही त्याच्या नजरेच्या टप्प्यात आले.
                    ईशांतने न्यूझिलंडच्या पहिल्या डावात पाच बळी घेताच भारतातर्फे कसोटीत सर्वात जास्त वेळा पाच बळी घेणारा तिसरा वेगवान गोलंदाज बनला. ईशांतने आपल्या ९७ व्या कसोटीत ११ वेळा डावात ५ किंवा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. त्याच्या अगोदर झहीर खानने ९२ कसोटीत ११ वेळा तर सर्वाधिक २३ वेळा अशी कामगिरी कपिलदेवने १३१ कसोटयात साकारली.
                    परदेशी भूमीवर सर्वाधीक वेळा डावात पाच किंवा अधिक बळी घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. त्याच्यापुढे असलेल्या झहीरखान व भागवत चंद्रशेखर यांनी प्रत्येक ८-८ वेळा ही कामगिरी केली. तर ईशांतने ९ वेळा हा कारनामा करत या दोघांना मागे टाकले. आता त्याच्या पुढे केवळ कपिलदेव १२, तर अनिल कुंबळे १० वेळी अशी कामगिरी करणारे गोलंदाज आहेत.
                कसोटीत सर्वाधीक बळी घेणारा ईंशात भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज आहे. फक्त कपिलदेव १३१ कसोटीत ४३४ बळी व झहीर खान ९२ कसोटीत ३११ बळी मिळवून त्याच्या पुढे आहेत. ईशांतला लवकरच बळीच्या बाबतही झहीरला मागे टाकण्याची संधी आहे . तर कसोटींचे शतक झळकाविण्याचा विक्रमही त्याला खुणावत असून असे झाले तर दि ग्रेट कपिलदेव नंतर अशी कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल.
                   ईशांत शर्माचा जन्म २ सप्टेंबर १९८८ रोजी दिल्लीमध्ये झाला. फूट ४ इंच उंचीचा हा ८४ किलो वजनाचा तगडा गडी शालेय शिक्षण मात्र दहावीपर्यंतच घेऊ शकला. लंबू नावाने परिचीत असलेल्या ईशांतने वयाच्या १९ व्या वर्षीच भारतीय संघात मिळविले.  २५ मे २००७ रोजी बांगलादेशविरूध्द तो पहिली कसोटी खेळला. २९ मे २००७ रोजी एक दिवशीय आंतरराष्ट्रीय  सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळून पदार्पण केले. तर १ फेब्रुवारी २००८ रोजी टि-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा ऑस्ट्रेलिया विरूध्द केला.
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment