तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी ! माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक एकादशीचा सोहळ्यासाठी सुमारे साडेतीन लाख भाविकांनी हजेरी लावली

पंढरपूर | चंद्रभागेच्या तीरावर आज माघ शुद्ध एकादशी निमित्त संपूर्ण पंढरीनगरी ही विठूनामाच्या जयघोषात न्हाउन निघाली आहे. या एकादशीचा सोहळ्यासाठी सुमारे साडेतीन लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. गेल्या काही वर्षातील माघी एकादशीच्या तुलनेत यंदा झालेली भाविकांची गर्दी सर्वाधिक आहे.

माघ महिन्यातील आजच्या जया एकादशी निमित्त विठ्ठलाची बुधवारी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते सपत्नीक नित्यपूजा करण्यात आली. तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते सपत्नीक झाली.

विठुरायाच्या नित्य पूजेनंतर माघी एकादशीच्या अनुपम अशा सोहळ्यास सुरवात झाली. पहाटेपासूनच भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी गर्दी केली होती. चंद्रभागा स्नानानंतर विठुरायाची शिखरदर्शन नामदेव पायरी दर्शन करीत लाखो भक्तांनी ज्ञानोबा तुकाराम यांच्या गजरात नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. एकादशीचे व्रत आणि पंढरीची वारी सत्कारणी लावली.

आज एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारणपणे 20 तासांचा कालावधी लागत आहे. तर थेट विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एका मिनिटाला 40 भाविक दर्शन घेत आहेत. मुखदर्शनासाठी देखील साधारणपणे दोन तासाचा कालावधी आज लागत आहे. एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण पंढरीनगरी तसेच चंद्रभागेच्या पैलतीरावरील 65 एकर परिसर देखील भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा भाविकांची जास्त गर्दी असलेली पहावयास मिळाली.

No comments:

Post a Comment