तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

न्युझिलंडविरूध्दच्या पराभवाचे असली कारण काय ?


               गेली तीन वर्ष आयसीसीच्या कसोटी रेटींगमध्ये अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ विश्वविजेत्याचं बिरूद घेऊन न्यूझिलंड दौऱ्यावर गेला. तेथे कर्मधर्म संयोगाने शेवटच्या तीन सामन्यात हातातोंडाशी आलेले विजय न्यूझिलंडला मिळविता न आल्यामुळे भारताला ५-० असा अनपेक्षीत विजय मिळाला. या विजयाने हुरळून जात भारताने न्यूझिलंडला किरकोळ समजण्याची भयंकर चुक केली. त्याची परिणीती तिनही एकदिवशीय सामन्यात न्यूझिलंडने जिगरबाज खेळ करत भारताला सगळे देव आठवायला लावले. हे कमी की काय ? म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात कसोटीचे वर्तमान विजेते व सध्या सुरू असलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतीत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या गर्वाचा फुगा सव्वातीन दिवसात फोडून न्यूझिलंडने भारताची तयारी व आव्हान किती तकलादू होते हे दाखवून दिले.
               विंडीजमधील दोन सामन्यांच्या मालिके व्यतिरीक्त भारताने द. आफ्रिका व बांगलादेश या कमजोर संघाविरूद्ध घरच्या मैदानावर फिरकीला धार्जिण्या आखाडा खेळपट्टयांवर विजय मिळविल्याने आकाश ठेंगणे झाले होते. परंतु हाच संघ जेंव्हा परदेशात ग्रीन टॉप विकेटवर मिळाल्यावर व नाणेफेकीचा कौल विरोधात जाताच सर्व पितळ उघडे पडले. कमजोर गोलंदाजांना कुटणारे तेच फलंदाज असली धारदार माऱ्यासमोर कसाया समोरच्या बकऱ्यासारखे भासले.
               ज्या वेगवान गोलंदाजांच्या बळावर जग जिंकायला निघालेला भारतीय संघ निव्वळ किवीज फलंदाजांनी सोडा त्यांच्या गोलंदाजांनी दिलेल्या जबर माराने हवालदिल झालेले दिसला. इतकेच नाही तर विश्वविक्रमी कर्णधार म्हणून गणला जाणारा कर्णधार अगदी वेडयाच्या दवाखान्यातून पळून आलेल्या चक्रम माणसासारखा भासत होता. क्षेत्ररक्षण कसं लावायचं हेच तो विसरून गेला होता. विरुद्ध संघाचे तळाचे फलंदाज दांडपट्टयासारखी बॅट फिरवून चेंडू मैदानाबाहेर पिटाळत असताना विद्वान कर्णधाराने त्यांच्या भोवती क्षेत्ररक्षकांचा फास आवळायचे सोडून सिमारेषेवर क्षेत्ररक्षक लावून टि २० सामना असल्यासारखे मुग गिळून बसला होता.
                   पत्रकार परिषदांमध्ये मोठमोठया वल्गना करणारे कर्णधार - कोच प्रत्यक्ष सामन्यात कोणतीच रणनिती जवळ नसल्याने अक्षरश : उघडे पडले. संघ प्रबंधन संघ निवड करता फॅनफाईट, माय ड्रीम इलेव्हन, माय इलेव्हन सर्कल व इतर लकी ड्रॉ पध्दतीने सामन्यापूर्वी संघ निवडण्याची स्पर्धा घेणाऱ्या कंपन्याशी हात मिळविणी करतात का ? हा लाखमोलाचा प्रश्न उपस्थित राहातो. कारण या कंपन्याच्या जाहीरात करण्यात विरेंद्र सेहवाग व खुद्द बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा समावेश आहे. 
                   सामन्यापूर्वी कर्णधार पत्रकार परिषदेत संभाव्य संघाची घोषणा करतो व प्रत्यक्षात सामन्यात वेगळाच संघ खेळवितो. दौऱ्यावर एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात न खेळणारा रिषभ पंत थेट कसोटी संघात निवडला जातो व विश्वातला नंबर एक यष्टीरक्षक म्हणून ज्या शास्त्री - कोहलीने गौरविलेला वृध्दीमान साहा बाहेर बसवला जातो. हे कसले लक्षण आहे ? पंतचे इतके लाड नेमके कशासाठी ? भारतातील सारी गुणवत्ता जणू त्याच्यात एकटयातच आहे ? आजवर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला मिळाली नसेल एवढी संधी त्याला मिळाली आहे. तो मात्र प्रत्येक वेळी संधीची माती करून टाकतो. या मागे नेमके काय गौडबंगाल आहे ?
                 काही दिवसांपूर्वी बांगलादेश विरूद्ध बॅट व बॉलने सनसनाटी कामगिरी करणारा सर्व भारतीय गोलंदाजातला सर्वात भन्नाट वेगाचा उमेश यादव बाहेर बसविला जातो, व फिटनेस टेस्ट देऊन ऐनवेळी न्यूझिलंडमध्ये पोहोचलेल्या ईंशात शर्माला थेट संघात स्थान मिळते. हे कसले लक्षण ? भले ईंशात यशस्वी झाला म्हणून हा विषय बाजूला केला जाऊ शकतो. परंतु जर सामन्या दरम्यान त्याची दुखापत उफाळली असती तर ? आधीच नंबर एक गोलंदाज जसप्रित बुमराहा दुखापतीमुळे स्वतःची लय हरवून बसला असताना एवढी मोठी रिस्क घेण्याचे कारण काय ?
                 रन मशिन ( कोहली ) सध्या बिघडली असून तिला सध्या गॅरेजमध्ये ( आरामासाठी ) पाठविण्याची गरज आहे. परंतु आपल्या गैरहजेरीत रोहीत शर्मा चांगली कामगिरी करून आपल्याला धोका निर्माण करेल या भितीपोटी कोहली आरामही घ्यायला नाही म्हणतो. सतत खेळून त्याच्यावर ताण पडतो. त्याचा परिपाक म्हणजे न्यूझिलंड दौऱ्यातील त्याचे अपयश. पूर्ण दौऱ्यात ९ सामन्यात फक्त  २०१ धावा याच संघाच्या अपयशाचे मुळ कारण आहे. 
              हे असंच राहीले तर क्रिकेट शौकीन क्रिकेट पासून हजारो मैल दूर पळतील.
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment