तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

परळीत 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्घाटन ; स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर सजली शिवसृष्टी!परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि. २७) ---- : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव तसेच महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येत असलेल्या महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे निर्मित ऐतिहासिक 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे उद्घाटन उद्या शुक्रवार (दि.२८) रोजी सायंकाळी ६.०० वा. बीडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांच्या हस्ते शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील भव्य प्रांगणात उभारलेल्या स्व. पंडित अण्णा मुंडे रंगमंचावर होणार आहे.

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याच्या माध्यमातून परळी सह परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य व प्रेरणादायी इतिहास अनुभवायला मिळणार असून या महानाट्यामध्ये सिने अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारत आहेत. तब्बल २५० कलाकार, घोडे, बैलगाड्या यांसह वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील भव्य प्रांगणात उभारण्यात आलेली शिवसृष्टी या नाटकाचे प्रमुख आकर्षण आहेत. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती महेंद्र महाडिक यांनी केली असून सिनेअभिनेते रवी पटवर्धन हे औरंगजेबाची भूमिका साकारत आहेत.

दरम्यान २८, २९ फेब्रुवारी व ०१ मार्च असे तीन दिवस या महानाट्याचे प्रयोग दररोज संध्याकाळी ०७ वा होणार असून या ऐतिहासिक नाटकाचे उदघाटन बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांच्या हस्ते उद्या (दि. २८) सायंकाळी ६.०० वा होणार आहे. यावेळी जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई शिरसाट, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार, जि. प.उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार, परळीच्या नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष श्री. शकिल कुरेशी यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या तीन दिवसीय महानाट्यासह शिवसृष्टी, शिवकालीन गावरचना, शस्त्रास्त्रे, छत्रपती शिवरायांचे सिंहासन, आदी शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे. तरी या उदघाटन समारंभासह 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्यास परळी व परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाटकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरक व जाज्वल्य इतिहासास अनुभवावे असे आवाहन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment