तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 23 March 2020

बीडसह राज्यात संचारबंदी लागू, घरी राहूनच कोरोनाला हरवणे शक्य - धनंजय मुंडेनागरिकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे शासनाचे कठोर पाऊल

बीड/परळी वैजनाथ (प्रतिनिधी)(दि. २३) ---- : जनता कर्फ्युनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राज्यात संचारबंदी लागू केली आहे. सर्व जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या असून, नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाला हरवणे शक्य आहे, त्यामुळे संचारबंदीचे काटेकोर पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

आज (दि.२३) मध्यरात्री पासून बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करत जिल्ह्याच्या सर्व सीमा ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात येत असून अत्यावश्यक कामाशिवाय जिल्ह्याबाहेरील नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही.

संचारबंदी अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेतच नागरिकांना बाहेर पडता येईल. या व्यतिरिक्त ४ पेक्षा जास्त लोकांनी जमाव केल्यास आता कारवाईचा सामना करावा लागेल असे आज जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

शासकीय कार्यालयांमध्येही केवळ ५% कर्मचारी उपस्थित असतील, उर्वरितांना ३१ मार्चपर्यंत घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रवासी वाहतूक, बससेवा इत्यादी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, केवळ जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारी वाहतुकच आता सुरू राहील असेही या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान जिल्ह्यात जनता कर्फ्युनंतर आज सकाळपासून अनेक ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात यासाठी ही कठोर पाऊले उचलावी लागत असल्याचे पालकमंत्री मुंडे यांनी म्हटले आहे.

अधिकाऱ्यांच्या संपर्कात, आढावा व सूचनांचे सत्र सुरूच...

दरम्यान दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी येथील निवासस्थानी 'वर्क फ्रॉम होम' करत जिल्ह्यातील परिस्थितीचा जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला व संचारबंदीच्या अनुषंगाने आवश्यक सूचना केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, तसेच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कोरोनाबद्दल नागरिकांना सातत्याने आवाहन करत आहेत.

पुढील काही दिवस घरात बसूनच ही लढाई जिंकावी लागेल, प्रसंगी नियम आणखी कठोर करावे लागले तरी हरकत नाही परंतु आता गर्दी करणे टाळावेच, संचार बंदीसह जिल्हा व राज्य प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment