तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 26 March 2020

'त्या' शिवकन्येची औरंगाबादच्या शिशुगृहात रवानगी, महिनाभर सांभाळ केलेल्या डॉ. रांदड यांना अश्रू अनावर!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- (दि.२५) : फेब्रुवारी महिन्यात (दि. २४ फेब्रुवारी) परळी येथील रेल्वे पटरीजवळ सापडलेल्या नवजात शिवकन्येची तब्येत आता सुधारली असून तिची औरंगाबाद येथील शिशुगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

दरम्यान एक महिना आपल्या दवाखान्यात शुश्रूषा केलेल्या डॉ. विजय रांदड यांना शिवकन्येची पाठवणी करताना अश्रू अनावर झाले.

२४ फेब्रुवारी रोजी परळी येथील बरकतनगर भागातील रेल्वे पटरीजवळ एका महिलेला एक नवजात अर्भक काटेरी झुडुपात फेकून दिलेले आढळून आले, त्या बाळाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारो' या गीताप्रमाणे खा. सुप्रियाताई सुळे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे त्या चिमुकलीच्या मदतीला धावून आले. धनंजय मुंडे यांनी तिला दत्तक घेत असल्याचे जाहीर करत तिचे 'शिवकन्या' असे नामकरण केले.

ना. मुंडे यांनी त्यांचे वर्गमित्र बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय रांदड यांच्या रुग्णालयात आपल्या सहकाऱ्यांकरवी तिला दाखल केले. सर्व परिस्थिती डॉ. रांदड यांना सांगितली व शिवकन्येवर त्वरित उपचार करण्याचे सांगितले.

मातृ - पितृ छत्र हरवलेल्या त्या लहानशा मुलीप्रति धनंजय मुंडे यांचा हळवा व संवेदनशील स्नेहभाव पाहून त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने हळहळ व चिंता व्यक्त केली होती.

डॉ. विजय रांदड यांनी त्या बालिकेला अतिदक्षता विभागात ठेऊन त्वरित उपचार सुरू केले, तिचा नित्यक्रम ठरवला व औषधोपचार सुरू ठेवले. एक महिन्यात केवळ दीड किलो वजन असलेले हे बाळ आता ठणठणीत बरे झाले असून तिचे वजन दोन किलोच्या वर झाले आहे. पुढे शिवकन्येला औरंगाबाद येथील शिशूगृहात ठेवले जाणार असून तिथंच तिचे संगोपन होणार आहे.

डॉ. रांदड यांनी याबद्दल माहिती सांगताना अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'मला धनंजय मुंडे यांचा फोन आला, त्यांच्यातील हळवा बाप पाहून मला कुतूहल वाटले, मी त्यांना या मुलीचा योग्य उपचार करण्याची खात्री दिली होती. हा माझ्यासाठी अत्यंत वेगळा अनुभव होता. शिरूर चे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह अनेकांनी शिवकन्येला भेट दिली, मला व माझ्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले, यामुळेच मी माझे मित्र ना. मुंडे यांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो.'

डॉ. रांदड यांनी ना. धनंजय मुंडे खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह  डॉ. सचिन भावठाणकर, सर्व सहकारी, कुटुंबीय आदींचे आभार मानले आहेत.

दररोज अनेक लहान मुलांचा उपचार करणारे डॉ. विजय रांदड यांना एक महिना उपचार केलेल्या शिवकन्येला शिशूगृहात पाठवताना डोळ्यात पाणी आले, जगाला नकोशी असलेल्या चिमुकल्या शिवकन्येने अनेक लोकांमध्ये माणुसकी जागी केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

No comments:

Post a Comment