तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 9 April 2020

सात दिवसात एप्रिल महिन्‍याचे 3 हजार 908 मेट्रिक टन अन्‍नधान्‍य लाभार्थ्‍यांना वाटपाचा जिल्ह्याने उच्चांक गाठला


13 एप्रिलपासून मोफत तांदूळ होणार वाटप

प्रतिनिधी
 परभणी :- कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर सुरू असलेल्‍या लॉकडाउन काळात जिल्‍ह्यातील कुठलाही नागरीक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्‍न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्‍या आहेत. जिल्‍ह्यातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानांमधून धान्‍याचे वितरण सुरळीत सुरू असून दि. 1 ते 7 एप्रील 2020 या सात दिवसात परभणी जिल्‍ह्यातील 1 लाख 47 हजार 432 शिधापत्रिका धारकांना तब्‍बल 3 हजार 908 मे.टन अन्‍नधान्‍याचे वाटप करण्‍याचा उच्‍चांक गाठला आहे. तसेच जिल्ह्यात टंचाई भासवून चढ्या दराने मालाची विक्री करणा-या दुकानदारांवर कारवाई करण्‍यात येत असल्‍याची माहिती परभणीचे जिल्‍हाधिकारी दी.म. मुगळीकर व जिल्‍हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्‍वाती सुर्यवंशी यांनी दिली आहे. 
 जिल्‍ह्यात राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्‍योदय व प्राधान्‍य कुटूंब लाभार्थी असे दोन्‍ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्‍याची संख्‍या सुमारे 12 लाख आहे. या लाभार्थ्‍याना परभणी जिल्‍ह्यातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानांव्‍दारे सार्व‍जनिक वितरण व्‍यवस्‍थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्‍या लाभार्थ्‍यांना अंत्‍योदय योजनेअंतर्गत 2 रूपये किलो दराने प्रती कार्ड 23 किलो गहू आणि 3 रूपये दराने प्रती कार्ड 12 किलो तांदूळ दिला जातो. त्‍याचप्रमाणे 20 रूपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्‍या प्राधान्‍य कुटूंब लाभार्थ्‍याना व एपीएल शेतकरी पात्र लाभार्थ्‍याना 2 रू. किलो दराने प्रती व्‍यक्‍ती 3 किलो गहू आणि 3 रू. किलो दराने प्रति व्‍यक्‍ती 2 किलो तांदूळ दिला जातो.
      परभणी जिल्‍ह्यात या सर्व योजनेमधून सुमारे 2 हजार 395 मे.टन गहू, 1 हजार 513 मे.टन तांदूळ, तर 24.096 मे.टन साखरेचे वाटप करण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर स्‍थलांतरीत झालेले परंतु लॉकडाउनमुळे जिल्‍ह्यात अडकलेल्‍या सुमारे 4 हजार 664 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्‍या ठिकाणी शासनाच्‍या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पध्‍दतीने अन्‍नधान्‍य घेतले आहे. 
         प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटूंब योजनेच्‍या प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्‍याची योजना आहे. उपरोक्‍त प्रमाणे नमूद पात्र  रेशनकार्ड धारकांने नियमीत स्‍वस्‍त धान्‍य खरेदी केल्‍यानंतर त्‍या कुटूंबातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला 5 किलो अतिरीक्‍त तांदूळ मोफत देण्‍याची सुचना केंद्र शासनाने दिलेली आहे. त्‍यामुळे आता अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटूंब योजनेच्‍या पात्र रेशनकार्ड धारकांला नियमित धान्‍य घेतल्‍यानंतर प्रति व्‍यक्‍ती 5 किलो तांदूळ दि. 13 एप्रील 2020 पासून शिधापत्रिकेतील व्‍यक्‍तींच्‍या संख्‍येनुसार मोफत उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे.  या योजनेकरीता तांदळाचे नियतन केंद्रीय वखार महामंडळाकडून प्राप्‍त करून घेतले जात आहे. दि. 13 एप्रिल 2020 पासून पात्र लाभार्थ्‍यांना मोफत तांदळाचे वितरण रास्‍तभाव दुकानदारामार्फत सुरू करण्‍यात येणार आहे. हे मोफत धान्‍य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्‍ये सुध्‍दा त्‍या त्‍या महिन्‍यात उपलब्‍ध करून दिले जाणार आहे. 

चढ्या दराने वस्‍तूंची विक्री केल्‍यास होणार कारवाई

 जिल्‍ह्यात जीवनावश्‍यक वस्‍तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्‍तूंचा पुरवठा सुरळीत व्‍हावा याकरीता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्‍या लॉकडाउनच्‍या पार्श्‍वभुमीवर काळाबाजार व अतिरीक्‍त भाव वाढींच्‍या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्‍त होत आहेत. जीवनावश्‍यक वस्‍तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्‍यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्‍त्र विभाग व पोलीस यांना संयुक्‍त कारवाई करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. असे परभणीच्या  जिल्‍हा पुरवठा अधिकारी  श्रीमती स्वाती सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a comment