तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 April 2020

तपासणीची शंभरी, 89 घरी!


औरंगाबाद ,दिनांक 17 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) आज 102 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर काल आणि आजचे मिळून 89 रूग्णांची कोविड तपासणी निगेटिव्ह आली, त्यांना आज आवश्यक औषधींचा सल्ला देऊन घरी पाठवण्यात आल्याचे रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी म्हणाले.
कोविड 19 (कोरोना) संसर्गामुळे औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 28 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) 22, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात एक  अशा एकूण 24 कोरोनाबाधित रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
मिनी घाटीत आज तपासण्यात आलेल्यांपैकी 52 जणांच्या लाळेचे नमुने शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे पाठवण्यात आले आहेत. 19 अहवाल येणे अपेक्षित आहेत. रुग्णालयात 54 जणांना भरती करून देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे. तर 23 जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
घाटीत 32 रुग्ण भरती, 01 पॉझिटिव्ह
घाटीत मागील 24 तासात (दुपारी 12 वाजेपर्यंत) 25 रुग्णांची तपासणी करण्यात आली.  सध्या 32 कोविड संशयित रुग्ण भरती आहेत. त्यापैकी 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. 01 पॉझिटिव्ह रुग्ण आहे. 10 जणांच्या लाळेचे नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहेत, असे डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

No comments:

Post a comment