तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 24 April 2020

साहित्यिकांनी मानले देवदूतांचे आभारमुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य आणि समाज सेवा ह्यांची योग्य सांगड घालत साहित्यसंपदा समूह अल्पावधीतच आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सर्वत्र चर्चेचा आणि अभिमानाचा विषय बनला आहे. सध्या सुरू असलेल्या "लॉकडाऊन" मध्ये साहित्य क्षेत्राशी निगडित विविध २१ स्पर्धांचे आयोजन करून लोकांना सकारात्मक विचार करण्यास आणि वेळेचा सदुपयोग करीत आंतरिक कलागुणांना वाव मिळण्यास मदत करून आपला वेगळेपणा जोपासला.
 सगळीकडे लॉक डाऊन असताना सुद्धा आपली जवाबदारी पार पाडणाऱ्या डॉक्टर्स ,नर्सेस ,पोलीस ,अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ,दुकानदार शेतकरी ह्यांचे आभार मानण्यासाठी समूहातर्फे "पत्रलेखन" स्पर्धेसाठी राज्यातील विविध स्तरांतून आणि विविध भागांतून पत्रे मागविण्यात आली होती. साहित्यसंपदा समूहाच्या ह्या स्पर्धेला महाराष्ट्र राज्यातून भरघोस प्रतिसाद लाभला. समाजातील विविध घटकांचे आभार ह्या पत्रांतून मांडण्यात आले होते.
दिवसरात्र उन्हातान्हात झटणाऱ्या पोलीसांचे आभार सौ. सीमा हरकरे, काल्हेर, प्रा. अर्चना कुलकर्णी अंबाजोगाई, सौ. सपंदा राजेश देशपांडे, रायगड ह्यांनी आपल्या पत्रातून मानले. तसेच पोलिसांच्या मनावरच्या ताणाने, कुटुंबियांवरच्या मनःस्थितीवर होणारा परिणाम शारदा खेडकर, मुंबई ह्यांनी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेल्या आपल्या बहिणीला पत्र लिहून सगळे कुटुंब पाठीशी असल्याचे सांगून मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला.
निरनिराळे देशांनी ह्या रोगापुढे हात टेकलेले दिसत असताना भारत मात्र बाकी देशांना मदतीचा हात देऊ करत आहे, हे श्रुती कुलकर्णी, सोलापूर आणि वैशाली झोपे, अंबरनाथ ह्यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रातून मांडून, भारताबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
समाजसेवेचे घेतलेले व्रत पूर्ण करताना जीवाची पर्वा न करणाऱ्या डॉक्टर्स नर्सेस ह्यांचे ऋण कधीही फिटणार नाहीत ही भावना पत्रलेखनातून सुरेंद्र बालंखे, ठाणे ह्यांनी नमूद केले. ह्या उपक्रमाचे वैशिष्टय म्हणजे डॉक्टरांनीही नोंदविलेला सहभाग. डॉ. शिवकुमार पवार, नांदेड ह्यांनी देशातील सर्वच अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांना पत्र लिहिले आणि त्यांचे बळ वाढविले.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलेले तात्काळ निर्णय व त्यांची शीघ्र कार्यवाही केल्याने लाखो प्राण वाचले त्याबद्दल मंजुळ शिवाजी चौधरी, शिर्डी आणि सौ. प्राजक्ता आनंद हेदे, ठाणे ह्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे ह्यांना पत्र लिहून त्यांचेही आभार व्यक्त केले. तर सौ. सीमा पाटील, कोल्हापूर ह्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार ह्यांचे पत्रातून आभार मानले.
लॉकडाऊन काळात वीज पुरवठा, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी झटणाऱ्या सगळ्यांचे आभार समूह संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी आपल्या पत्रातून मांडले.
साहित्यसंपदा समूहाच्या ह्या उपक्रमाने लॉकडाऊनमध्ये झटणाऱ्या सगळ्यांचे आभार मानण्याबरोबरच समाजातील खरी परिस्थिती मांडणाऱ्या आणि ह्या काळात लोकांना घरी बसून महत्वाच्या घडामोडी दाखवून नियमांचे पालन करण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या विविध वृत्तपत्रांचे आणि वृत्त वाहिन्यांचे आभार मानले गेले. सर्व कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मनोमय मीडिया ह्यांनी पार पाडली.

No comments:

Post a comment