तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 April 2020

खासदार ताईंनी नेमून दिलेल्या भाजप पदाधिकाऱ्यानेच केली धान्य चोरी; दुकान परवानाही निलंबि


या कठीण काळात गोरगरिबांच्या धान्यात काळाबाजार करून हे पाप कुठं फेडाल? - राष्ट्रवादीचे विश्वास नागरगोजे यांची टीका

शिरूर कासार (प्रतिनिधी) :- राज्य सरकारने संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य पुरवठ्यापासून सर्वसामान्य नागरिक वंचित राहू नये म्हणून विविध योजनांमधून सुरू केलेल्या धान्य वाटपात भाजपचे पदाधिकारी तथा स्वस्त धान्य दुकानदार प्रकाश देसरडा यांनीच काळा बाजार केल्याची तक्रार २० जणांनी केल्यानंतर पुरवठा विभागाने त्यांचा दुकान परवाना निलंबित केला आहे. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे यांनी जोरदार टीका केली असून गोरगरीबांच्या धान्यात अशा कठीण काळात काळा बाजार करून हे पाप कुठे फेडणार असा घणाघाती आरोप केला आहे. विशेष म्हणजे धान्य वाटप सुरळीत व्हावे यासाठी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्हाभर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्याची माहिती आपल्या सोशल मीडिया खात्यावरून दिली होती, त्यात शिरूर कासारच्या नियतना मध्ये प्रकाश देसरडा यांचेही नाव दिले आहे. आता त्यांनीच धान्याचा काळाबाजार केल्याने इतर पदाधिकारी काय दिवे लावत असतील असे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचेही विश्वास नागरगोजे यांनी म्हटले आहे.

दरम्यान दहिवंडी ता. शिरूर कासार येथील एका महिलेसह अन्य १८ जणांनी देसरडा यांनी त्यांच्या दुकानात आपल्याला मानकुर असलेल्या धान्यापेक्षा कमी धान्य दिल्याच्या तक्रारी शिरुरचे तहसीलदार यांच्याकडे केल्या होत्या. त्यावर जाब विचारला असता 'नजरचुकीने धान्य कमी देण्यात आले' असे न पटणारे तोंडी उत्तर देसरडा यांनी दिले व त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. प्रकाश आघाव पाटील यांनी त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द केला आहे. 

भाजपचे पदाधिकारी तथा आ. सुरेश धस यांचे निकटवर्तीय असलेले देसरडा यांच्याविरुद्ध यापूर्वीही धान्याचा काळाबाजार केल्याच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत. तरीही खासदार ताईंनी धान्य वाटपाचे रक्षक म्हणून त्यांची केलेली नेमणूक म्हणजे चोराला राखण करायला सांगून आमंत्रण दिल्यासारखे आहे. असे कृत्य करताना किमान सुरू असलेल्या कठीण काळाचे तरी भान ठेवायला हवे होते, धान्य वाटप व विविध कारणांवरून सतत राजकारण करू पाहणारे आ. धस व भाजप नेतृत्व देसरडा यांच्यावर कारवाई करते की नेहमीप्रमाणे पाठीशी घालून त्यांच्या पापात भागीदार होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल असेही विश्वास नागरगोजे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a comment