तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 22 April 2020

शेतकरी "राजा" चा किती दिवस "बळी" देणार?


मालक असुन गुन्हेगारासारखे हाल, भाजीपाल्याला कवडीमोल भाव, बीट पुर्ववत सुरू करा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शेतकर्‍याला "राजा" म्हणुन संबोधले जात असले तरी वेळोवेळी त्याचाच "बळी" दिला जातो. म्हणुनच त्याला "बळी राजा" संबोधले जाऊ लागले आहे. आजही शेतकऱ्यांचे आतोनात हाल केले जात असुन मालक असुन गुन्हेगारासारखे वागवले जात आहे तर त्याने पिकवलेला भाजीपाला आणि फळ कवडीमोल दराने खरेदी केले जात आहे. खर्च आणि उत्पादनाचा मेळ बसत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. प्रशासनाने बीट पुर्ववत सुरू करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मालाचे बीट रद्द करून "शेतकरी ते थेट ग्राहक" संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात बसण्यास मज्जाव केला असुन भाजीपाला व फळ गल्लीबोळात गाड्यांवर फिरून विक्री करणे सक्तीचे केले आहे. शेतकऱ्यांना गल्लोगल्ली फिरून भाजीपाला आणि फळांची विक्री करणे होत नाही. त्यातही सध्या हातगाडेही भाड्याने मिळत नाहीत आणि गल्लीत एका जागेवर बसुन विक्रीही करायची नाही. अशी कोंडी शेतकऱ्यांची झाली आहे.
      सकाळी भाजीपाला घेऊन एखाद्या जागी थांबले की पोलीस आणि पालिका कर्मचारी शेतकऱ्यांना हुसकावून लावतात. कधी कधी माल हिसकावून घेतात तर कधी मारहाणही करतात. परिणामी शेतकरी मिळेल त्या भावाने व्यापार्‍यांना भाजीपाला विकुन निघुन जातात. गल्लोगल्ली जाऊन विकणार्‍यांना भाव ठरवून दिले आहेत पण शेतकऱ्यांकडून घेण्याचे भाव ठरवले नसल्याने कवडीमोल भावाने भाजीपाला विक्री करावी लागत आहे. यातुन शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. तालुक्यातील कानडी येथील शेतकरी रामेश्वर कदम यांनी पपई लागवड केली. पण पपई कवडीमोल बाजारात विक्रीसाठी भाव मिळत असल्याने हवालदिल झाले आहेत. लाखोंच्या घरात खर्च असून पदरी मात्र शुन्य पडायची वेळ झाली आहे. त्यांनी टरबूज पण लागवड केली असून शेतातील बाजारात आणण्यासाठी परवडत नाही म्हणून त्यांनी शेतातच येणाऱ्यांना पाच रुपये किलो कवडीमोल विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी व पुर्ववत बीट सुरू करून माल विक्री करण्यासाठी परवानगी घ्यावी असे आवाहन शेतकरी रामेश्वर कदम यांनी केले आहे.

No comments:

Post a comment