तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 April 2020

दक्षिण कोरीयाचे अनुकरण केल्यास भारत कोरोना मुक्त होईल-सचिन चितळे(विश्वनाथ देशमुख सेनगावकर)


सेनगाव:-दक्षिण कोरिया कडून शिकण्यासारखे
 चीन,अमेरिका,युरोप,इंग्लंड व जगभरातील जवळ-जवळ सर्वच देश या कोरोना च्या विळख्यात अडकलेले असताना दक्षिण कोरियाने मात्र या विळख्यातून आपली सुटका अगदी यशस्वीपणे करून घेतली असेच म्हणावे लागेल.आज भारत देश कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी कसा लढा द्यायचा यासाठी काही गोष्टीचे अनुकरण जर आपण दक्षिण कोरिया सारखे केले तर या वेढ्यातून आपण यशस्वीपणे बाहेर पडू असा मला विश्वास आहे.असे मत भारतीय असलेले व दक्षिण कोरीया मध्ये रिसर्च इंस्टीट्युर ऑफ केमिकल टेक्नोलाॅजी डेजाॅन संशोधक पदी काम करणारे सचिन काशिनाथराव चितळे यांनी व्यक्त केले.
   अगदी सुरुवातीला चीन नंतर दक्षिण कोरिया हे पहिले असे राष्ट्र होते जेथे कोरोना चा प्रादुर्भाव सर्वात अधिक झाला होता.       20 जानेवारी 2020 ला दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची  पहिली केस आढळली व 21 फेब्रुवारीपर्यंत 346 इतकी मर्यादित राहिली. मात्र यानंतर कोरोनाच्या  प्रादुर्भावामध्ये अचानक वाढ झाली यातून हा कम्युनिटी स्प्रेड आहे असा त्यांनी अनुमान मांडला. 29 फेब्रुवारीला एकाच दिवशी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 909 इतका झाला आता हा आकडा येणाऱ्या काही दिवसात खूप वाढेल म्हणून त्यांनी प्रतिबंधात्मक पावले उचलत 15 एप्रिल पर्यंत 10591 इतका मर्यादित ठेवला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृतांचा आकडा आजपर्यंत फक्त 225 इतकाच आहे.
   जगभरात हजारोंच्या संख्येने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना दक्षिण कोरियाने मात्र या सर्व बाबींवर अतिशय योग्य असे नियोजन करून रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवली आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाले तर 1.येथील सरकारने यासंबंधी राबवलेले धोरण:-दक्षिण कोरियात कोरोना रुग्णांची मोठी संख्या सुरुवातीच्या काळातच आढळत असताना येथील सरकारने तातडीने पावले उचलून तेथील कंपन्यांना कोरोना टेस्टिंग किट चे उत्पादन वाढविण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी 650 टेस्टिंग सेंटरची उभारणी केली. तसेच तेथील सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये वेगळ्या कोरोना आयसोलेशन वार्डची उभारणी केली आणि 3T ( ट्रेस, टेस्ट,ट्रीट) या फ़ॉर्मूल्यावर भर दिला.
 जेथे मोठे राष्ट्र दर दिवशी खूप कमी टेस्टिंग करत होते तेथे दक्षिण कोरिया दर दिवशी 15-20 हजार सॅम्पल टेस्ट केले.याखेरीज दक्षिण कोरियाने ड्राइव्ह थ्रू टेस्ट यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या,यामध्ये कोरोना बाधित  मनुष्य कोणाच्याही संपर्कात न जाता त्या केंद्रापर्यंत स्वतः ड्राईव्ह करत जाऊन गाडीतून न उतरता सॅम्पल देऊन येणार आणि त्याला त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीच त्याचा रिपोर्ट भेटणार अशी सोय त्यांनी करून ठेवली होती.यामध्ये आणखीन एक बाब म्हणजे जो रुग्ण रुग्णालयांमध्ये पॉझिटिव म्हणून दाखल होता त्याची त्यांनी चार आठवडे सुटकाच केली नाही. मास्कचा तुटवडा पडू नये म्हणून प्रत्येक आठवड्याला प्रत्येक व्यक्तीला दोन मास्क सरकार तर्फे मोफत देण्यात आले.याबरोबरच सरकारने सॅनिटायझर चा तुटवडा पडू दिला नाही.
2. आधुनिक तंत्रज्ञानावर भर:- कोरोना झालेल्या व क्वारेंटाईन असलेल्या रुग्णांच्या मोबाईल चे लोकेशन,सी.सी. टिव्हीफुटेज तसेच डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर कुठे व किती वेळा केला आहे या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची तातडीने तपासणी करून घेतली व त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही केली. अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोना चा प्रादुर्भाव रोखला.
3. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग:- कुठल्याही प्रकारचा लॉक डाऊनलोड न करता दक्षिण कोरियाने यशस्वी पद्धतीने कोरोनाशी लढा दिला यामध्ये सरकारचे यश जरी असले तरी लोकांचा सहभाग ही खूप मोठी बाब आहे. दक्षिण कोरियातील देगू नावाच्या शहरात सर्वात जास्त म्हणजे 70%प्रादुर्भाव झाला होता. तेथील नागरिकांनी प्रवास टाळून घरीच राहण्यास प्राधान्य दिले.येथील नागरिकांनी जागरूकता दाखवत वारंवार हात धुणे, मास्क चा वापर, सॅनिटायझर चा वापर यावर भर दिला. सर्वात महत्वाचे सोशल डिस्टनसिंग बद्दल विशेष काळजी घेतली. विशेष म्हणजे आता हे शहर जवळजवळ कोरोना मुक्त झाले आहे.
  यातून माझे मत असे आहे की भारतवासीयांनी देखील भारत सरकारने नेमून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले  व स्वतःला सोशल डिस्टनसिंग चे नियम घालून घेतले तर या कोरोना विरुद्ध च्या लढाईत आपला देखील विजय निश्चित होईल.सचिन काशिनाथराव चितळे हे मुळचे मायचाळ ता. बसवकल्याण जि.बिदर  (कर्नाटक)येथील आहेत.


सचिन काशिनाथराव चितळे
संशोधक,
कोरिया रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ़ केमिकल टेक्नोलॉजी, डेजॉन,साऊथ कोरीया.
sachinkcm@gmail.com

No comments:

Post a comment