तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 April 2020

कोरोनाव्हायरस मुळे टरबूज उत्पादक शेतकरी देशोधडीला

  विकण्याची सोय होत नसल्याने शेतकरी हवालदिल

 शासनाने फळबागायती शेतकऱ्यांना अनुदान देऊन शेतकरी वाचवावे-राहुल केंद्रे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
कोरोनाव्हायरस मुळे अख्खे जग हैरान झाले असून जवळपास जगात सर्वत्र लाॅकडाऊन असून अगोदरच अनेक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांचे कोरोनाव्हायरस मुळे कधी न भरून निघणारे नुकसान झाले आहे व होत आहे.त्यात फळबागायती शेतकऱ्यांचे तर प्रचंड मोठे नुकसान कोरोनाव्हायरस मुळे झाले आहे. याविषयी तालुक्यातील पांगरी येथील प्रगतशील शेतकरी श्री.राहुल केंद्रे यांची भेट घेऊन त्यांनी पपई व टरबूज अशा घेतलेल्या जोड पिकांची पाहणी केली असता फळबागायती शेतकऱ्यांवर किती भयानक व विदारक प्रसंग कोरोनाव्हायरस मुळे ओढवला आहे हे प्रत्यक्ष पाहण्यात व अनुभव घेण्यात आले.

राहुल केंद्रे यांनी पांगरी-लिंबुटा तांडा रस्त्यावर गट क्रमांक १५७ मधील आपल्या शेतात तीन एकर मध्ये पपईची लागवड गत दोन जानेवारीला केली असून आंतरपीक म्हणून गत २६ जानेवारी रोजी टरबूज लागवड केली आहे.यासाठी त्यांनी मोहोळ जिल्हा सोलापूर येथील बोडके नर्सरी येथून पपईची रोपे व टरबूज बीज मोठी रक्कम खर्च करून आणले व ते आपल्या तीन एकर शेतीमध्ये त्याची लागवड केली.सध्या टरबूज वेलांना मोठ्या प्रमाणावर फळे लागली असून त्याचा काढणी हंगामही सुरू झाला आहे.पपईचे फळ काढणी हंगाम जून महिन्यात अपेक्षित असल्याचे श्री.केंद्रे यांनी यावेळी सांगितले.परंतु टरबूज फळाचा काढणी मोसम व कोरोनाव्हायरस भारतात,महाराष्ट्रात येण्याचा मोठा बाका योगायोगाचा प्रसंग एकत्र आल्यामुळे व सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे टरबूज फळांना मार्केट मिळणे,ग्राहक,व्यापारी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याचे राहुल केंद्रे यांनी सांगितले.शासन व प्रशासनाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन केले आहे.गर्दी टाळण्यासाठी अगदी मोजक्याच तारखा व वेळा जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी ठरवून दिल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात टरबूज फळ विकणे शक्य होत नसून काही वेळेला टरबूज फळे असलेले  वाहन पोलिस प्रशासनाच्या मेहरबानीने विक्रीच्या ठीकाणी न्यावे लागतात.  विक्री साठी असलेला कमि वेळ,होणारी धावपळ यामुळे काही वेळेस अपेक्षित माल विकला जात नाही व तसाच फळ माल वापस न्यावा लागतो.आणि परत विक्री तारीख व वेळेची वाट पहावी लागते असेही केंद्रे म्हणाले.

राहुल केंद्रे यांनी सांगितले की आज कोरोनाव्हायरस संकट नसते तर आपल्या शेतातील दर्जेदार असलेल्या टरबूजांना किमान १० ते १२ रुपये प्रति किलो प्रमाणे जाग्यावर भाव मिळाला असता व टरबूज पिकाने चांगली कमाईही झाली असती.परंतु सध्या याच टरबूज फळांना दोन रुपये प्रति किलो सुद्धा ग्राहक किंवा व्यापारी मिळणे दुरापास्त झाले आहे.एकूण तीन एकर शेतीमध्ये असलेले टरबूज कोरोणा नसता तर किमान पाच लाख ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले असते.याविषयी खंतही केंद्रे यांनी व्यक्त केली.श्री.राहुल केंद्रे यांनी पपई व टरबुजाच्या घेतलेल्या जोड पिकास विहीर व बोरचे पाणी देतात.यासाठी त्यांनी सुधारित शेतीचा अवलंब करत मल्चिंग पद्धत (पेपर शेती)ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करत जैविक खतांचा वापर केला आहे.यासाठी त्यांना मोठा खर्च आला असून कोरोनाव्हायरसचा फळ बागायति शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसल्याचेच यातून समोर येत आहे.शासनाने अशा शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

 

       

शासनाच्या मदतीची अपेक्षा

 कोरोनाव्हायरस मुळे फळबागायती शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे एक प्रकारे कंबरडेच कोरोनाव्हायरस मुळे मोडल्याचे चित्र समोर येत असून अशा शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची मोठी अपेक्षा आहे. 

No comments:

Post a comment